बारावीच्या बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात; राज्यातील 14 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी देणार परीक्षा

आजपासून राज्यभरात माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात होईल. पण विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच म्हणजेच साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर हजार राहायचे आहे.

12th board exam starts from today

आजपासून राज्यभरात माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे. सकाळी 11 वाजता विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात होईल. पण विद्यार्थ्यांना अर्धा तास आधीच म्हणजेच साडेदहा वाजता परीक्षा केंद्रावर हजार राहायचे आहे.

कोरोना नियम शिथिल झाल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच बारावीच्या परीक्षा कोरोनाचे कोणतेही नियम न लावता घेण्यात येणार आहेत. राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेला संपूर्ण राज्यातून 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले असल्याची माहिती शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे. राज्यभरात 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे तर ही परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी 271 भरारी पथके नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रांवर लक्ष ठेवणार आहेत. परीक्षेला 11 वाजता सुरुवात होणार आहे परंतु विद्यार्थ्यांना अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे.

बोर्ड परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना 10 मिनिटे आधी प्रश्नपत्रिका दिली जात होती. परंतु यंदाच्या वर्षापासून परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर 10 मिनिटे विद्यार्थ्यांना वाढवून देण्यात आलेली आहेत. तर कॉपी सारखे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्राजवळील 100 मीटर अंतरावरील झेरॉक्सची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महत्वाची बाब म्हणजे जर एखादा विद्यार्थी कॉपी करताना पकडला गेल्यास त्या विद्यार्थ्यावर फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकतो. भरारी पथकांकडून परीक्षा सुरु होण्याआधी विद्यार्थ्यांची झाडाझडती घेण्यात येणार असल्याची माहिती देखील शिक्षण मंडळाने दिली आहे.

हेही वाचा – सर्वोच्च न्यायालयात आजपासून पुन्हा तीन दिवस महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष

दरम्यान, पेपर फुटीचा प्रकार टाळण्यासाठी यंदा शिक्षण मंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका घेऊन येणारे परिरक्षक यांनी आपले जीपीएस म्हणजेच लाईव्ह लोकेशन परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे. तर परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात 25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट असेल, हे पाकीट उघडताना त्यावर वर्गातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाईल त्यानंतर पर्यवेक्षक स्वाक्षरी करून सीलबंद पाकिटातील प्रश्नपत्रिका वितरित केली जातील.