घरक्राइम७० अनधिकृत लॉजधारकांना नोटीसा; कारवाई मात्र शून्य

७० अनधिकृत लॉजधारकांना नोटीसा; कारवाई मात्र शून्य

Subscribe

प्रशासनावर कुणाचा दबाव; भूमिकेबाबत संशय

त्र्यंबक रोडवरील लॉजिंगचा विषय अतिशय गंभीर बनत चालला असून, अनेक जणांनी शासनाच्या नाकावर टिच्चून कुठलीही परवानगी न घेता बेकायदेशीर पद्धतीने इमारती उभ्या केल्या आहेत. शासकीय यंत्रणेने याकडे डोळेझाक केल्याने त्र्यंबक रस्त्याला अनधिकृत लॉजिंगचा विळखा पडला आहे. दरम्यान, यापैकी ७० लॉजधारकांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) ने नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसा बजावून अनेक दिवस उलटले तरी प्रत्यक्षात कारवाई होत नसल्याने यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे का?, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
त्र्यंबक रोडवरील लॉजिंग प्रश्न गाजत असताना अनेक लॉजेस अनधिकृतपणे चालवले जात असल्याची माहिती पुढे आली आहे. लॉजधारकांनी शासनाची कुठलीही परवानगी न घेता मिळेल त्या ठिकाणी बेकायदेशीर पद्धतीने इमारती बांधल्या आहेत. त्र्यंबक रस्त्यावर दुतर्फा जिकडे नजर जाईल तिकडे अधिकृत लॉजिंगचे जाळे पसरल्याचे दिसून येत आहे. या लॉजिंगमुळे त्र्यंंबक रस्त्यावरील नैसर्गिक सौंदर्याला बाधा  निर्माण झाली आहे. बहुसंख्य लॉजिंगची रचना संशयास्पद असून, ते भाविकांसाठी आहे असे कुणी म्हणूच शकत नाही. या लॉजिंगमध्ये मोठ्या प्रमाणात महागड्या कार आणि दुचाकी उभ्या असतात. यावरूनच लॉजिंगमध्ये नेमके काय चालते हे लक्षात येते. काही लॉजिंगवर कुंटणखाना सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे त्र्यंबकेश्वरच्या धार्मिकतेला गालबोट लागत आहे.  लॉजिंग चालकांच्या मुजोरपणामुळे शासकीय यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा आरोप केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी अनधिकृत लॉजिंगची गंभीर दखल घेत नाशिक महानगर प्रदेश  प्राधिकरण (एनएमआरडीए) ने नाशिक आणि त्र्यंबक तालुक्यातील जवळपास ७० अनधिकृत लॉजधारकांना बांधकाम नियमित करून घेण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, या नोटिसांना अत्यल्प प्रतिसाद लाभल्याने हे लॉजिंग अनधिकृत असल्याचे स्पष्ट होत आहे. नोटीसा बजावून अनेक दिवस उलटून देखील कारवाई होत नसल्याने प्रशासनावर कुणाचा दबाव आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लॉजधारकांना राजकीय  वरदहस्त असल्याचाही दावा केला जात आहे. म्हणूनच त्र्यंबक रस्त्याला अनधिकृत लॉजिंगचा विळखा पडल्याचे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या सर्वच कारणांमुळे त्र्यंबकेश्वरचे पावित्र्य कमी होत असून, भाविक आणि ग्रामस्थांनी याबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्त्व  कायम ठेवण्यासाठी  तरी या अनधिकृत  लॉजिंगवर कारवाई  करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
त्र्यंंबक रस्त्यावरील ७० लॉजधारक आणि अन्य व्यावसायिकांना बांधकाम नियमित करून घेण्यात बाबत नोटीसा बजावल्या आहेत. यापैकी चार ते पाच प्रस्ताव प्राप्त झाले असून उर्वरीत अनधिकृत बांधकाम तोडण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.
सतीश कुमार खडके, आयुक्त, नाशिक
महानगर प्रदेश प्राधिकरण (एनएमआरडीए)
त्र्यंबकरोडवरील लॉजिंगमध्ये सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायामुळे एक मोठी सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. या लॉजिंगचा गैरवापर शाळकरी विद्यार्थ्यांपासून प्रौढांपर्यंत केला जातो. या लॉजिंगमुळे परिसरातील शाळा, महाविद्यालयातील मुलींनाही मोठ्या त्रासाचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर ‘आपलं महानगर’ ‘अनैतिकतेचे लॉजिंग’ मालिका सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील आपल्या प्रतिक्रिया ९०२२५५७३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवाव्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -