Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे अभिजीत बिचुकले आता कसबापेठ निवडणूक लढवणार; म्हणाले, भकास...

अभिजीत बिचुकले आता कसबापेठ निवडणूक लढवणार; म्हणाले, भकास…

Subscribe

Abhijit Bichukale will elect Kasba Bypoll Election | मागच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आदित्य ठाकरेंना फाईट देण्याकरता वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसंच, राष्ट्रपती पदासाठीही आपण इच्छूक असल्याचं ते म्हणाले होते.

Abhijit Bichukale will elect Kasba Bypoll Election | पुणे – बिगबॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी कसबा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिनविरोधासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीने धोबीपछाड दिला. तसंच, आता अभिजीत बिचुकले यांनीही या जागेवरून उमेदवारी अर्ज भरल्याने ही पोटनिवडणूक अधिक रंजक होण्याची शक्यता आहे.

अभिजीत बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज विकत आणला होता. उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची तारीख होती. शेवटच्या दिवशी अभिजीत बिचुकले यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे.”

- Advertisement -

मागच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी आदित्य ठाकरेंना फाईट देण्याकरता वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसंच, राष्ट्रपती पदासाठीही आपण इच्छूक असल्याचं ते म्हणाले होते. स्टाइल स्टेटमेंट, वक्तव्य यांमुळे अभिजीत बिचुकले सातत्याने चर्चेत असतात. बिग बॉसमध्येही त्यांनी धुमाकूळ घातला होता. आता ते राहत असलेल्या मतदारसंघातून ते उभे राहत असल्याने त्यांचे निकटवर्तीय त्यांना किती साथ देतात हे पाहावं लागणार आहे.

कसबा पेठेत अजून कोण?

- Advertisement -

मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर कसबा पेठ विधानसभा जागेवर पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. २६ फेब्रुवारी रोजी या मतदान होणार असून २ मार्चला निकाल लागणार आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, या जागेवरून निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीने शिक्कामोर्तब केलं असून उमेदवारही जाहीर केले आहेत. भाजपामधून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

- Advertisment -