इंग्रजी प्रश्नपत्रिकेनंतर बोर्डाने आणखी एका प्रश्नपत्रिकेत केला घोळ; विद्यार्थी संतप्त

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पण परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बोर्डाकडून इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत घोळ घालण्यात आला. हा घोळ परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी देखील कायम आहे. बोर्डाकडून हिंदी प्रश्नपत्रिकेत सुद्धा मोठी चूक करण्यात आली आहे.

After the English question paper, the board messed up another question paper Students angry

महाराष्ट्र शिक्षण मंडळातील बारावीच्या बोर्ड परीक्षांना मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. कोरोनाचे नियम शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच परीक्षा केंद्रांवर कोणतेही नियम न लावता परीक्षा घेण्यात येत आहेत. परंतु परीक्षेच्या पहिल्याच दिवशी बोर्डाकडून इंगर्जी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत मोठा घोळ करण्यात आला. बोर्डाने या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे दिले होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका सोडविताना विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. पण आता पुन्हा एकदा बारावीच्या आणखी एका प्रश्नपत्रिकेत चूक झाल्याची माहिती समोर आली आहे.

बारावीच्या हिंदी विषयाची बुधवारी (ता. २३ फेब्रुवारी) परीक्षा पार पडली. पण यावेळी हिंदी प्रश्नपत्रिकेत असलेल्या एका चुकीमुळे विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवताना चांगलेच वैतागलेले दिसले. हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक 1,2,1,2 असे देण्यात आले. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना 1,1,1,1 असे क्रमांक देण्यात आले होते. हे क्रमांक 1,2,3,4 असे असायला हवे होते. पण प्रश्नपत्रिकेत चुकीचे आकडे दिल्याने विद्यार्थ्यांचा हा प्रश्न सोडविताना गोंधळ उडाला.

याआधीच बारावीच्या इंग्रजी प्रश्नपत्रिकेत बोर्डाकडून चूक करण्यात आली होती. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नच छापून आला नव्हता. तर त्याऐवजी प्रश्नपत्रिकेत उत्तर छापून देण्यात आले होते. इंग्रजी पेपर मध्ये तीन प्रश्नांमध्ये एका प्रश्नात उत्तर दिले आहे तर इतर दोन प्रश्नांमध्ये तपासणाऱ्याला सूचना दिल्यामुळे विद्यार्थ्यांना नेमकं काय लिहायचं याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

संपूर्ण राज्यातून बारावीच्या परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसले आहेत. संपूर्ण राज्यात 3 हजार 195 केंद्रावर बारावीच्या परीक्षा घेण्यात येत आहेत. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी 21 हजार 396 कर्मचारी कार्यरत आहेत, तर 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करणार आहेत.

हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष; सर्वोच्च न्यायालयात आज तिसरा दिवस, सुनावणी संपणार की…

दरम्यान, पेपर फुटीचा प्रकार टाळण्यासाठी यंदा शिक्षण मंडळाकडून विशेष खबरदारी घेण्यात आलेली आहे. प्रश्नपत्रिकेची गोपनीयता अबाधित ठेवण्यासाठी प्रश्नपत्रिका-उत्तरपत्रिका घेऊन येणारे परिरक्षक यांनी आपले जीपीएस म्हणजेच लाईव्ह लोकेशन परीक्षा केंद्रावर पोहोचेपर्यंत सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे. तर परीक्षा केंद्रातील प्रत्येक वर्गात 25 प्रश्नपत्रिकांचे सीलबंद पाकीट असेल, हे पाकीट उघडताना त्यावर वर्गातील दोन विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाईल त्यानंतर पर्यवेक्षक स्वाक्षरी करून सीलबंद पाकिटातील प्रश्नपत्रिका वितरित केली जातील.