लोकपालसाठी अण्णा हजारे पुन्हा बसणार उपोषणाला

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे ३० जानेवारी २०१९ रोजी उपोषणाला बसणार आहे.

social activist anna hazare
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. लोकपाल बिलासाठी अण्णा हजारे ३० जानेवारी २०१९ रोजी उपोषणाला बसणार आहे. वारंवार आश्‍वासने देऊनही लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती होत नसल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे महात्मा गांधी यांच्या पुण्यातिथीदिनी ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धीमध्ये आंदोलनाला सुरुवात करणार आहेत. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्रसिंह यांना शनिवार, १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सरकारच्या वेळकाढूपणाविषयी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्‍त केली आहे.

वाचा : मुंढेंची वारंवार बदली दुर्दैवी -अण्णा हजारे

गांधी जयंतीलाही दिला होता उपोषणाचा इशारा

लोकपाल, लोकायुक्तांची नियुक्तीसह विविध मागण्यांसाठी हजारे यांनी २ ऑक्टोबरपासून राळेगणसिद्धीमध्ये बेमुदत उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला होता. मात्र, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करून हजारे यांना आंदोलनापासून परावृत्त केले होते. त्यावेळी देण्यात आलेल्या आश्‍वासनांची अद्याप पूर्तता न झाल्याने हजारे यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, देशात वाढत चालेल्या भ्रष्टाचारास कंटाळून जनतेने २०११ मध्ये लोकपाल, लोकायुक्त कायद्याच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

वाचा : अण्णा हजारेंचे उपोषण मागे!

लोकपालासाठी आग्रही 

लोकपाल आणि लोकायुक्त हा आपला वैयक्‍तिक नव्हे तर, देशातील भ्रष्टाचार रोखण्याचा प्रश्‍न आहे. चर्चेतून प्रश्‍न सुटतात यावर आपला विश्‍वास आहे. मात्र, आता असे वाटत आहे की, सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे. सरकारला साडेचार वर्षांचा कालावधी झालेला आहे. एवढा प्रदीर्घ कालावधी उलटल्यानंतरही लोकपालाची नियुक्त होत नाही. यावरून हे स्पष्ट होते की, सरकारला लोकपाल, लोकायुक्त नियुक्तीची इच्छा नाही. सरकारने दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती झाली नाही, तर पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे ३० जानेवारी पासून आपण राळेगणसिद्धीत उपोषण करणार असल्याचे हजारे यांनी या पत्रात नमूद केले आहे.

वाचा : मोदी सरकारविरोधात अण्णा हजारेंचे गांधी जयंतीला पुन्हा उपोषण