घरताज्या घडामोडीराज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

राज्यात सेना-भाजप युतीचं सरकार, एकनाथ शिंदेंकडून घोषणा; भाजपचेही मानले आभार

Subscribe

विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण केले. त्यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून गेल्या १०-१२ दिवसांत घडलेल्या घटनेवर थोडक्यात भाष्य केलं.

राज्यात शिवसेना-भाजप युतीचं (Shivsena-BJP Alliance) सरकार असून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री पदाची संधी देऊन भाजपने लोकशाहीचा सन्मान केला आहे,अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपचे आभार मानले. विधानसभा अध्यक्षपदी भाजपच्या राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांची निवड झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भाषण केले. त्यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडून गेल्या १०-१२ दिवसांत घडलेल्या घटनेवर थोडक्यात भाष्य केलं. तसेच, सध्याचं सरकार हे सेना-भाजपची युती करून झालेलं सरकार असल्याचीही स्पष्टोक्ती दिली. (announcement of Sena-BJP alliance government in the state, by Eknath Shinde; Thank you BJP too)

हेही वाचा – राहुल नार्वेकर नवे विधानसभा अध्यक्ष; शिंदे सरकारचा पहिला विजय

- Advertisement -

राहुल नार्वेकरांचा अभिनंदनाचा ठराव

लोकशाहीतील पवित्र मंदिर असलेल्या सार्वभौम ठिकाणी राहुल नार्वेकर यांची निवड झाल्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो. सरकारच्या वतीने अभिनंदनाचा ठराव मांडतो. विधिमंडळ हे लोकशाहीचं पवित्र मंदिर आहे. या विधानसभेला अध्यक्षांची अत्यंत उच्च अशी परंपरा लाभलेली आहे.

राहुल नार्वेकर हे स्वतः कायद्याचे उत्तम जाणकार आहेत. आधी ते शिवसेनेत होते, आता भाजपमध्ये आहेत, त्याआधी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही होते. त्यामुळे या सर्व पक्षांना अभिप्रेत असलेल्या भूमिकांची त्यांना उत्तम जाण आहे. पक्षाची हीच भूमिका प्रवक्ते म्हणून मांडताना त्यांनी वेळोवेळी आपल्यातील हे गुण दाखवून दिलेले आहेत. त्यामुळे कोणताही पक्षीय अभिनिवेश न बाळगता ते सदनातील सर्व सदस्यांना निश्चितच समान न्याय देण्याचा प्रयत्न करतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या विधिमंडळाला अनेक उत्तम अध्यक्षांची मोठी परंपरा आहे. कै. ग. वा. माळवणकर यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा शेषराव वानखेडे, बाळासाहेब देसाई, अरुण गुजराती, दिलीप वळसे पाटील, हरिभाऊ बागडे आणि नाना पटोले यांच्यापर्यंत आलेली आहे. त्यामुळे या विधिमंडळात कायमच अध्यक्षांना एक वेगळं महत्व आणि मान राहिलेला आहे. तीच धुरा आपल्या खांद्यावर पुढे घेऊन चालण्याची जबाबदारी आता राहुल नार्वेकर यांच्या खांद्यावर आलेली असून ते ती नक्कीच पूर्ण क्षमतेने निभावून नेतील असा विश्वास यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

हेही वाचा बंडखोर आमदारांना अतिरेक्यांसारखं आणलं, कसाबसाठीही एवढा बंदोबस्त नव्हता; आदित्य ठाकरेंचा खोचक टोला

कायद्यापुढे सर्व समान अशा तत्वानुसार आपल्याकडून निर्णय होतील अशी अपेक्षा आहे. लोकशाहीचा हा स्तंभ भारतीय प्रणालीतील प्रथा, परंपरा, नैतिकाता या माध्यमातून उभारला असून यातून सार्वभौम काम चालतं. त्यामुळे आम्हाला झुकंतं माप देऊन काम करावं अशी अपेक्षा नाही. पारदर्शकपणे राज्याचा कारभार चालवायचा आहे. महत्त्वाचे निर्णय घेऊन आम्हाला मार्गदर्शक सूचना कराव्यात. विधानसभा सदस्यांमध्ये अनेक तरुण आमदार आहेत. या तरुणांच्या व्यथा आपण तत्परतेने सोडवाल.

सर्व सन्मानीय सदस्यांच्या वतीने सभागृहातील कोणत्याही सदस्यावर अन्याय होऊ न देता त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता येतील, विधेयकावर मोजके सूचक मत ठेवता येईल, समज देण्याची जबाबदारीदेखील आपली आहे. न्यायाची कामगिरी उत्तम पार पाडाल. सरकारला मार्गदर्शक आणि निर्देश द्याल, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा …तर, आपण राज्याचे मुख्यमंत्री असता; राऊतांचा फडणवीसांना टोला

साध्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्री बनवलं

गेल्या १०-१५ दिवसांत घडामोडी घडल्या त्याचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. या राज्यात शिवसेना-भाजपा सरकार स्थापन झालं आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचे विचार, त्यांची वैचारिक भूमिका घेऊन पुढे चाललो आहोत. यासाठी सहकारी पक्षांचं मोलाचं सहकार्य लाभलं. नेहमी विरोधकांकडून सत्ताधारी बनता येतं. मात्र, येथे पहिल्यांदाच सत्तेवर असणारे मंत्री पायउतार झाले. माझ्यासह ८ ते ९ मंत्र्यांनी पदे सोडली. मी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा साधा कार्यकर्ता आहे. पण ५० विधानसभा सदस्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला, हे मी माझं भाग्य समजतो. ११५ आमदार त्यांच्याकडे होते. माझ्याकडे फक्त ५० होते. पण मनाचा मोठेपणा दाखवून मला मुख्यमंत्री पदाला समर्थन दिलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डी मी यांचे आभार मानतो. मला काहीच नको होतं. पण भाजपने सन्मान केला. भाजपने लोकशाहीला, वैचारिक भूमिकेला पाठिंबा दिला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्व पक्षांच्या डोळ्यात अंजण घालण्याचा निर्णय भाजपने केला आहे.

…तर चार्टड विमानाने पाठवलं असतं

बंडखोरी काळात जोरजबरदस्तीचा प्रयत्न झाला नाही. काहींनी म्हटलं की आमच्या संपर्कात काही लोक आहेत. मी त्यांना म्हटलं कोण आहेत संपर्कात त्यांची नावे सांगा. मी स्वतः चार्टड विमानाने त्यांना पुन्हा परत पाठवण्याची सोय करतो. एका आमदाराला आम्ही माझ्या चार्टड विमानाने सन्मानाने परत पाठवलं.

 

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -