एकनाथ शिंदे केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते, अंबादास दानवेंची मुख्यमंत्र्यांवर टीका

aurangabad

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधीला एक महिना उलटत आहे. मात्र, राज्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्र्यांचे खातेवाटप आणि पक्षासंबंधीत कायदेशीर बाबींमुळे मुख्यमत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्ली दौरा करत आहेत. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

अंबादास दानवे काय म्हणाले? –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रात जाऊन मुजरा करणारे नेते आहेत. त्यांचा स्वतःचा असा बाणा नाही. भाजपच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना चोरून काम करावे लागते आहे. ते लपून छपून दिल्लीत जातात. पण शिवसेनेत सगळे ओपन होते, अशी टीका शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे. औरंगाबादेतून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यामुळे पायखालची वाळू सरकली आहे –

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच औरंगाबाद दौरा झाला. जिल्ह्यातील विविध तालुक्यात त्यांनी शिवसंवाद यात्रा घेतल्या. यावेळी शेकडो शिवसैनिकांची गर्दी जमली होती. शिवसैनिकांचा उत्साह पाहून यांच्या पायखालची वाळू सरकली आहे. आदित्य ठाकरे आले नसते तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर सुद्धा आले नसते. असे वक्तव्य अंबादास दानवेंनी केले आहे.

सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तारांचे शक्तीप्रदर्शन –

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दौऱ्या निमित्त सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार मोठं शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे बोलले जातं आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, असे शक्तिप्रदर्शन करण्याची अब्दुल सत्तारांना नेहमीच सवय आहे. अब्दुल सत्तार लिमिटेड आणि त्यांचा मुलगा समीर सत्तार लिमिटेड आशा कंपन्या आहेत आणि त्यातून हे असे रोडशो आणि शक्तिप्रदर्शन करत असतात, अशी टीका दानवेंनी केली.