घरमहाराष्ट्रगितेंचा शिवसेनाप्रवेश म्हणजे 'खाऊ तिथे जाऊ'

गितेंचा शिवसेनाप्रवेश म्हणजे ‘खाऊ तिथे जाऊ’

Subscribe

शिवसेनाप्रवेशानंतर नांदगावकरांचा गितेंवर पलटवार

माजी आमदार वसंत गिते हे शिवसेनेत जाण्यापूर्वी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही परत येण्याची ‘ऑफर’ दिली होती. यासाठी पक्षाच्या काही वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी गिते यांची भेट घेतली होती. त्यावेळी गिते यांनी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याविषयी तक्रार करुन राज ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन मला पक्षातून बाहेर जाण्यास भाग पाडल्याचा आरोप केला होता. या आरोपास आता नांदगावकरांनी फेसबुकच्या पोस्टव्दारे प्रत्युत्तर दिले आहे. ‘खाऊ तिथे आम्ही जाऊ’ अशा शब्दात नांदगावकरांनी गितेंवर पलटवार केला आहे.

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वसंत गिते यांनी नाशकात सर्वपक्षीय नेते- कार्यकर्त्यांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन केले होते. त्याचवेळी गिते आता भाजपला ‘राम राम’ करणार असे बोलले गेले. त्यानंतर आठवड्यानंतर खासदार संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झालेत. त्यांनी गितेंची भेट घेत चर्चा केली व त्याच दिवशी गितेंचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला. दरम्यानच्या काळात मनसेच्या काही पदाधिकार्‍यांनीही गितेंची भेट घेतल्याचे बोलले जाते. या भेटीत गितेंना पुन्हा एकदा मनसेत येण्याचे निमंत्रण देण्यात आले. मात्र गितेंनी मनसेच्या नांदगावकर, सरदेसाई आणि अभ्यंकर या नेत्यांविषयी तक्रार केली. त्यास नांदगावकरांनी फेसबुकव्दारे उत्तर दिले आहे.

- Advertisement -

काय म्हटले होते गिते

पक्षाला चांगले दिवस आणल्यानंतर भविष्यात स्पर्धक निर्माण होईल, अशी भीती निर्माण झाल्याने राज ठाकरे यांना चुकीची माहिती देऊन मला पक्षातून जाण्यास ज्यांनी भाग पाडले, त्या बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई व अविनाश अभ्यंकर यांच्याबरोबर पुन्हा काम करावे का?

काय म्हटले नांदगावकर

दोन दिवसांपूर्वी नाशिकमधील काही ‘अतिशय मोठे’ नेते बोलले की नांदगावकर, सरदेसाई, अभ्यंकर यांच्यामुळे पक्ष सोडला. हे तेच ‘मोठे नेते’ आहेत ज्यांनी मनसेची चलती असताना सेना सोडली. भाजपची सत्ता असताना मनसे सोडली. सेनेची सत्ता असताना परत भाजप सोडली. एवढ्या ‘निष्ठावंत’ नेत्यांवर काय बोलणार यांचे ‘खाऊ तिथे आम्ही जाऊ ’अन् ‘जिथे भेळ तिथे खेळ’ अशा प्रकारचे राजकारण त्यांनाच लखलाभ असो. शक्यतो वैयक्तिक शेरेबाजी करणे राजकीय जीवनात कायमच टाळत आलो. परंतु काही लोक आपली पायरी ओळखून राहत नाही. म्हणून ही स्वाभाविक प्रतिक्रिया येते. – बाळा नांदगावकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -