लाडक्या बाप्पांचं आज आगमन

नवीन नाशिक : ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बुधवारी (दि.३१) घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवानिमित्ताने विविध सार्वजनिक मंडळांकडून देखाव्यांवर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच, घरोघरी गणपतींच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, गणेश स्थापनेच्या पूर्वसंध्येलाच मुसळधार पाऊस झाल्याने या तयारीवर काहीसे पाणी फेरले गेले.

दोन वर्षांनंतर कोरोना नियमांच्या निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव उत्साहात व मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. शास्त्रानुसार या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असला तरी ज्योतिष अभ्यासकांच्या दृष्टीतून यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल १० वर्षांनंतर एक दुर्मिळ योगही आला आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव भाविकांच्या दृष्टीने अधिक खास ठरला आहे.

गणपती आणण्यासाठी मुहूर्त

भाद्रपद शु ४ बुधवार दिनांक ३१.८.२०२२ रोजी आनंदी दिवस असल्याने सकाळी ६.२५ ते सायंकाळी ६.५३-वाजेपर्यंत श्री गणपती आणला तरी चालेल
अतिउत्तम मुहूर्त सकाळी : ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत
लाभ व अमृत योग सकाळी : ११ ते १२.३० वाजेपर्यंत
शुभ योग सायंकाळी : ५.३० ते ६.५३

श्री गौरी आवाहन मुहूर्त

शनिवार दिनांक ३.९.२०२१ रोजी दिवसभर आहे अतिउत्तम गौरी आवाहनाचा मुहूर्त सकाळी ९ च्या आत सायंकाळी २.३० ते ५.३० लाभ व अमृत योग आहे काही पुर्वज सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी म्हणजे सायंकाळी ६ ते ७ (गोरज मुहूर्तावर) नेहमीच्या पद्धतीने श्री गौरी आवाहन करतात व पूजन करतात.

१० वर्षांनंतर जुळून आला योग

वैदिक दिनदर्शिकेनुसार, ज्या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला होता, त्यादिवशी जे शुभ योग होते तेच योग यावर्षीच्या गणेश चतुर्थीला आले आहेत. याआधी १० वर्षांपूर्वी गणेश जयंतीच्या दिवशी असा योग जुळून आला होता. शास्त्रानुसार, भाद्रपदाच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला होता. तो दिवस बुधवार होता. या वर्षीही भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी बुधवारी आली असून या शुभ योगायोगात गणपतीची उपासना करणे भक्तांसाठी शुभ ठरेल, असे मानले जाते.

https://www.facebook.com/mymahanagar/videos/1471233276722480