‘धन्यवाद, मोदीजी’ अभियानातून पंतप्रधानांना पाठवली जाणार 15 लाख लाभार्थ्यांची आभार पत्रं

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 'धन्यवाद मोदीजी' अभियानाचा शुभारंभ

Prime Minister Narendra Modi Death threat D gang aide threatening message to Mumbai Police

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांसाठी केलेल्या योजनांचा लाभ झालेल्या राज्यातील लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेली पंधरा लाख पत्रे पंतप्रधानांपर्यंत पोहचविण्याचे भारतीय जनता पार्टीचे ‘धन्यवाद, मोदीजी’ अभियान रविवारी सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या अभियानात मुंबईत गोरेगाव मतदारसंघात पन्नास लाभार्थ्यांशी संपर्क साधला.

बावनकुळे यांनी पत्रकारांना अभियानाची माहिती दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पक्षाच्या सेवा पंधरवडा अभियानाचे प्रमुख प्रदेश उपाध्यक्ष जयप्रकाश ठाकूर, उपाध्यक्ष कृपाशंकरसिंह, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, स्थानिक आमदार व माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर, ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानाच्या संयोजक प्रदेश सचिव श्वेता शालिनी आणि सहसंयोजक हर्षल विभांडिक उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सामान्य लोकांसाठी थेट लाभाच्या अनेक योजना सुरू केल्या व त्यांची यशस्वी अंमलबजावणी केली. घरकूल, शौचालय, वीज कनेक्शन, गॅस कनेक्शन, शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये, कोरोनाकाळात मोफत धान्य अशा विविध योजनांचे राज्यात पाच कोटी लाभार्थी आहेत. पहिल्या टप्प्यात त्यापैकी पंधरा लाख लाभार्थ्यांशी भाजपाचे कार्यकर्ते संपर्क साधणार असून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहेत. लाभार्थ्यांकडून गोळा केलेली अशी पंधरा लाख पत्रे १५ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे पाठविणार आहे.

ते म्हणाले की, राज्यातील सर्व ९७,००० बूथमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या अभियानात पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी सहभागी होणार आहेत. प्रत्येक कार्यकर्ते पाच घरांमध्ये लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांच्या हस्ताक्षरातील पत्रे घेणार आहे.

अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी २०२४ पर्यंत राज्यातील किमान दोन कोटी लाभार्थ्यांशी संपर्क साधण्याचे उद्दीष्ट आहे. एखाद्या घरात पात्र व्यक्तीला सरकारी योजनेचा अजून लाभ मिळाला नसल्याचे आढळले तर त्यांना तो लाभ मिळवून देण्यासाठीही कार्यकर्ते काम करतील, अशी माहिती त्यांनी दिली.

सरकारी कार्यालयात वंदे मातरम असे संबोधण्याच्या निर्णयाबद्दल आपण भाजपातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करतो. मातृभूमीबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा हा राष्ट्रीय उपक्रम आहे. हा भाजपाचा पक्षीय कार्यक्रम नाही. पक्षीय दृष्टीकोनातून राजकीय हेतूने काहीजण त्यावर टीका करत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही, असे बावनकुळे यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.