घरताज्या घडामोडीमोदींच्या दरबारात देवेंद्र फडणवीसांचाच करिष्मा; आयारामांना भाजपकडून संधी

मोदींच्या दरबारात देवेंद्र फडणवीसांचाच करिष्मा; आयारामांना भाजपकडून संधी

Subscribe

विधान परिषद निवडणूक इकडे मोठ्या आशेने डोळे लावून बसलेल्या ज्येष्ठ दिग्गज नेत्यांना भाजपने पुन्हा एकदा हाती नारळ दिला आहे. विनोद तावडे, एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या चारही माजी मंत्र्यांची व ज्येष्ठ नेत्यांची विधानपरिषदे करिता पुन्हा एकदा तिकिटे कापण्यात आली आहे. यापूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत खडसे, तावडे तसेच बावनकुळे यांना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी नाकारली होती. राष्ट्रवादीतून विधानसभेच्या निवडणुकीत आयात करण्यात आलेल्या दोघांना तर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक समजले जाणाऱ्या दोघांना भाजपने विधानपरिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीस यांचाच करिष्मा चालतो असे स्पष्ट संकेत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने महाराष्ट्र भाजपला दिले आहेत.

२१ मे रोजी होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपमधील दिग्गज नेते इच्छुक होते. त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. या चौघांना नाही तरी या चौघांपैकी काही नेत्यांना तरी भाजपा विधानपरिषदेत संधी देईल, अशी या भाजप नेत्यांची अटकळ होती. मात्र भाजपच्या केंद्रीय समितीने या चारही नेत्यांच्या हाती पुन्हा एकदा नारळ देत दोन नव्या चेहऱ्यांसह दोघा आयात उमेदवारांना विधानपरिषदेत उमेदवारी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने बारामतीमधून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवलेल्या गोपीचंद पडळकर हे वंचित बहुजन आघाडीतून तसेच रणजीत सिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांचा समावेश आहे. यावरून राष्ट्रवादी मधून भाजपमध्ये येत असलेल्या आणि आलेल्या आयारामांना सत्तापदाचे आमिष दाखवण्याचे भाजपचे प्रयोग सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

यामुळे विधानसभा निवडणुकीत सुरू झालेले राष्ट्रवादी खिळखिळी करण्याचे भाजपचे प्रयत्न अधिक मजबुतीने सुरू असल्याचा संदेश देण्यात भाजपला यश आले आहे. तर दुसरीकडे नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके व भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजित गोपछडे यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर केंद्रीय नेतृत्वाने विधानपरिषद करीता संधी दिली आहे.

प्रवीण दरेकर यांचे विरोधी पक्षनेते पद अबाधित

देवेंद्र फडणवीस हे शब्दांचे पक्के समजले जातात. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सत्ता येत नाही, असे लक्षात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आग्रहाने त्यांचे मित्र प्रवीण दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी बसवले. त्यावेळीही दरेकर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यास भाजपमधून काही मंडळींचा विरोध होता. परंतु दरेकर यांच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण ताकद उभी केल्याने पक्षीय विरोधकांची डाळ काही दरेकर यांच्यापुढे शिजली नाही. आताच्या विधानपरिषद निवडणुकीतही जर तावडे, मुंडे, खडसे अथवा बावनकुळे या चार ज्येष्ठ नेत्यांपैकी एकाला जरी उमेदवारी मिळाली असती तरी वरिष्ठतेच्या निकषांवर दरेकरांना परिषदेचे विरोधी पक्षनेते पद सोडावे लागले असते.

- Advertisement -

मात्र एकदा दिलेला शब्द फिरवतील अथवा त्या शब्दापासून मागे पडतील तर ते देवेंद्र फडणवीस कसले? त्यामुळे या चारही दिग्गज नेत्यांची उमेदवारी केंद्रीय समितीकडून बाद झाल्यामुळे भविष्यात प्रवीण दरेकर यांच्यासमोर भाजपमधून कोणाचे आव्हान उभे राहणार नाही, याची पूर्ण दक्षता फडणवीस यांनी घेतल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे दरेकर यांचे विधानपरिषदेतील विरोधीपक्षनेते पदही अबाधित राहिले आहे.

Sunil Jawdekarhttps://www.mymahanagar.com/author/sunil-jawdekar/
गेली २८ वर्षे वर्तमानपत्र क्षेत्रात कार्यरत. विविध राजकीय, सामाजिक, प्रशासकीय मुद्द्यांवर आणि पायाभूत सेवासुविधांवर लेखन.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -