गिरीश बापटांच्या स्थितीला भाजपाच कारणीभूत, सुषमा अंधारेंचा ठपका

warkari community aggressive against shiv sena sushma andhare

पुणे- पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत रंगत आली आहे. भाजपा आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. अशातच, भाजपाकडून भावनिक राजकारण खेळण्याचा प्रयत्न झाला. खासदार गिरीश बापट आजारी असतानाही त्यांना कार्यकर्ता मेळाव्यात बोलावण्यात आलं. नाकात नळी, बोटांवर ऑक्सीमीटर आणि ऑक्सिजन सिलिंडर घेऊन गिरीश बापट कार्यकर्ता मेळाव्यात सामील झाले होते. त्यांची खालावली प्रकृती पाहून सर्वांनीच हळहळ व्यक्त केली. यावरूनच, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीका केली आहे.

हेही वाचा – पुण्यात ठाकरे आणि शिंदे समर्थकांमध्ये तुफान राडा, नेमकं काय घडलं?

सुषमा अंधारे यांनी एक फेसबूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्या म्हणतात की, “भाजपाचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. गेले काही महिने त्यांच्यावर सातत्याने उपचार चालू आहेत. अशा स्थितीमध्ये त्यांनी हवेच्या संपर्कात येणे हे त्यांच्यासाठी प्रचंड घातक असू शकते असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ नोंदवतात. असे असताना बापटांना प्रचारात उतरवून त्यांच्या जीवाशी खेळ खेळण्याची असुरी कल्पना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात कशी काय येऊ शकते? गिरीश बापटांच्या आजच्या या स्थितीला भाजपाच कारणीभूत आहे..!

दरम्यान, गिरीश बापट रुग्णालयात दाखल असले तरी त्यांची प्रकृती चिंताजनक नाही. त्यांना आठवड्यातून दोन-तीन वेळा डायलिसिसीसाठी जावं लागतं. याचा अर्थ त्यांची प्रकृती खालवली आहे असा होत नाही. कार्यकर्ता मेळाव्यानंतर त्यांना डायलिसीससाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, असं स्पष्टीकरण गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट यांनी दिलं. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काल पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाजपाचे किंगमेकर गिरीश बापट यांची भेट घेतली होती.

पुण्यात दोन्ही गटांत तुफान राडा

दोन्ही गटाचे कार्यकर्ते एका विशेष कार्यक्रमासाठी पुण्यातील गांजवे चौकातील पत्रकार संघासमोर आले होते. त्यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. परंतु कार्यक्रम संपल्यानंतर शिंदे समर्थक बाहेर आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. या घोषणाबाजीनंतर ठाकरे समर्थक आक्रमक झाले. त्यानंतर त्यांनीही घोषणाबाजी करण्या सुरुवात केली. या कारणामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.