घरमहाराष्ट्र..म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या? सायबर एक्स्पर्टचा धक्कादायक दावा!

..म्हणून झाली गोपीनाथ मुंडेंची हत्या? सायबर एक्स्पर्टचा धक्कादायक दावा!

Subscribe

गोपीनाथ मुंडेंना इव्हीएम मशिनमध्ये झालेल्या घोळाबद्दल कल्पना होती म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक दावा अमेरिकेतल्या एका सायबर एक्स्पर्टने केला आहे.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या इव्हीएम मशीन हॅकिंगमुळेच झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेतील एका सायबर एक्सपर्टने केला आहे. मुंडेंना २०१४ साली झालेल्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिन हॅक करण्यात आल्याबद्दल माहिती होतं. म्हणून त्यांना मारण्यात आलं असा दावा करण्यात आला आहे. सय्यद शुजा असं या सायबर एक्सपर्टचं नावं असून सोमवारी संध्याकाळच्या सुमारास त्याने जाहीर पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. सय्यद शुजाच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून यावरून आता पुन्हा एकदा राज्यात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. तसेच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दावा करण्यात आल्यामुळे अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पाच वर्षांनंतर देखील मृत्यूचं गूढ कायम!

२०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर काही दिवसांतच म्हणजेच ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचा राजधानी दिल्लीमध्ये कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या मृत्यूवर अनेक संशय घेतले गेले. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वीच मुंडेंचं निधन झाल्यामुळे देशभरात हळहळ व्यक्त केली गेली. त्यानंतर कित्येक दिवस गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूवरून तर्क-वितर्क लढवले जात होते. मात्र, आता सय्यद शुजाच्या या दाव्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूभोवतीचं गूढ अजूनच वाढलं आहे.

- Advertisement -

दिल्ली निवडणुकांमध्ये देखील होणार होता घोळ?

‘या अत्यंत गोपनीय माहितीमुळे आपल्यावर काही दिवसांपूर्वी हल्ले देखील करण्यात आले होते. त्यामुळे गुप्त ठिकाणाहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवरून पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा करत असल्याचं’, सय्यद शुजानं सांगितलं आहे. शुजाच्या दाव्यानुसार २००९ ते २०१४ या कालावधीत तो इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कर्मचारी होता. त्यामुळे त्याला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. त्याने पुढे जाऊन असाही दावा केला आहे की, ‘२०१५मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये देखील अशाच प्रकारे इव्हीएम मशिनमध्ये फेरफार करून घोळ करण्यात येणार होता, मात्र वेळीच मध्ये पडून आम्ही दुर्घटना रोखली’, असं शुजा त्याच्या पत्रकार परिषदेत म्हणाला आहे. ‘या निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला ७० पैकी ६७ जागा मिळाल्या होत्या. मात्र, त्याच जागा भाजपला मिळून भाजपनं निवडणुका जिंकल्या असत्या’, असा दावा देखील शुजानं केला आहे.

हॅकरचे दावे:

  • गोपीनाथ मुंडेंना हॅकिंगची माहिती होती
  • इव्हीएम घोटाळा बाहेर काढणार होते म्हणून गोपीनाथ मुंडेंची हत्या करण्यात आली
  • हॅकिंगबद्दल कळल्यामुळेच मुंडेंची हत्या केली
  • उत्तर प्रदेश, महाराष्ट्र निवडणुकांमध्ये देखील इव्हीएम मशिन हॅक
  • इव्हीएम हॅकिंसाठी रिलायन्सची भाजपला मदत
  • २०१४ सालच्या निवडणुकांमध्ये इव्हीएम मशिन हॅक केलं गेलं
  • राजस्थान, छत्तीसगडमध्ये हॅकिंग आम्ही रोखलं
  • ब्लूटूथ, वायरलेसनं हॅकिंग शक्य नाही, हॅकिंगसाठी मशिन हॅकरजवळ असायला हवी
  • देशातल्या अनेक राजकीय पक्षांना इव्हीएम मशिन कशी हॅक होते, हे जाणून घ्यायचं होतं
  • इव्हीएम फेरफार प्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनआयएच्या अधिकाऱ्याचीही २०१५मध्ये हत्या करण्यात आली

निवडणूक आयोगाने फेटाळले दावे

भारतीय निवडणूक आयोगाने सय्यद शुजाचे आरोप फेटाळले आहेत. इव्हीएम मशिनचं उत्पादन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू झाला त्या दिवशीपासून आमचा आणि त्यांच्यावर प्रेम करणा-या प्रत्येक व्यक्तीचा हा अपघात का घात? हा संशय होता आणि तो आजही कायम आहे. गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघात असल्याचं सीबीआयने सांगून टाकलं होतं. मात्र, आता या हॅकरच्या दाव्यानंतर सीबीआयच्याही वर असणाऱ्या रॉने या संपूर्ण प्रकरणाचा तपास करायला हवा.

धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधानपरिषद

२०१४ च्या निवडणुकीत इव्हीएम हॅक करण्यात आले होते याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना होती. म्हणूनच त्यांची हत्या करण्यात आली असा दावा इव्हीएम तंत्रज्ञ सय्यद शुजा यांनी केला आहे, असे वृत्त वाहिन्यांवरून दाखवले जात आहे. इव्हीएम मशीनबाबत बहुतांश लोकांनी तक्रारी केल्या आहेत. हे प्रकरण गंभीर आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी.

अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

पत्रकार परिषदेला कपिल सिब्बल उपस्थित

दरम्यान, ज्या ठिकाणी सय्यद शुजाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकार परिषद झाली, त्या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल हे स्वत: हजर होते. त्यामुळे त्यांच्या या उपस्थितीवर राजकीय क्षेत्रातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भाजपचा कच्चा चिठ्ठा खोलून दाखवणाऱ्या या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे नेते काय करत होते?ते तिथे कसे गेले? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भाजपने नाकारले आरोप

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने सय्यद शुजाने केलेल्या आरोपांचा इन्कार केला आहे. ‘आगामी निवडणुकांमध्ये होणारा पराभव टाळण्यासाठी काँग्रेसकडून हॅकिंग हॉरर शो तयार केला जात आहे’, असा पलटवार भाजपचे प्रवक्ते मुख्तार अब्बास नख्वी यांनी केला आहे. ‘काँग्रेसकडे अनेक फ्रीलान्सर हॅकर आहेत, जे कधीकधी पंतप्रधान मोदींना सत्तेवरून हटवण्यासाठी पाकिस्तानला देखील जाऊन पोहोचतात’, अशी प्रतिक्रिया नख्वी यांनी दिली आहे.

 

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -