घरमहाराष्ट्रमंत्रिमंडळ विस्तारबद्दल मुनगंटीवारांकडून नव्या तारखेचा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मंत्रिमंडळ विस्तारबद्दल मुनगंटीवारांकडून नव्या तारखेचा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Subscribe

राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार येत्या चार दिवसांत होईल असा दावा शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केला होता. यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नवी तारीख सांगितली आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार १५ ऑगस्टपूर्वी होईल असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होईल असा संशय मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरुन येत आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं आहे. परंतु महिना झाला तरी अद्याप सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. परंतु शिंदे गटाच्या नेत्यानंतर भाजपच्या नेत्याने नवी तारीख सांगितली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, आजही कोणाला माहिती नाही की, शपथविधी कधी होणार? पण एक नक्की आहे की, साधारणत: १५ ऑगस्टपूर्वी हा शपथविधी केलाच पाहिजे आणि करावा लागेल. कारण अमृतमहोत्सवी वर्षाचं हे ध्वजारोहण आहे. म्हणून १५ ऑगस्टपूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार नक्कीच होईल याबाबत मनात शंका नाही, असे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

- Advertisement -

४ दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार – दीपक केसकर

शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना येत्या ४ दिवसांमध्ये म्हणजेच रविवारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी माहिती दिली होती. परंतु सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन सुनावणीमध्ये निर्णय आला नाही. पुढील सुनावणी ८ ऑगस्टला होणार आहे. दरम्यान दीपक केसरकर यांनी आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारावरुन विरोधकांची टीका

राज्यात ३४ दिवसांपेक्षा अधिक दिवस झाले तरी शिंदे- फडणवीस सरकारने मंत्रिमंडळाचा विस्तार केला नाही. यामुळे राज्यातील विकासकामे मंदावली आहेत. तसेच राज्यात अतिवृष्टी आणि पूग्रस्त परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीवरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार का रखडलाय याबाबत माहिती नाही. परंतु त्यांच्या नेत्यांकडून तारीख पे तारीख देण्याचे काम सुरु आहे, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावला आहे.


फोन टॅपिंगप्रकरणी संजय पांडेंना १६ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी; कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -