घरमहाराष्ट्रमोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

मोठी बातमी! अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

Subscribe

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राज्यात घमासान सुरू होते. मात्र, आता भाजपाने मोठा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीतून भाजपाने माघार घेतली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत घोषणा केली. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनी आज उमेदवारी अर्ज मागेही घेतला.

शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील जागा रिक्त झाली होती. या जागेवर ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली. या निवडणुकीवरून राज्यात प्रचंड वाद निर्माण झाले. ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्यात कलगीतुरा रंगला. शिवसेनेच्या पक्षनावासह चिन्हाचा वाद मुंबई हायकोर्टापर्यंत पोहोचला. त्यामुळे नाव आणि चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर, दोन्ही गटांनी स्वतंत्र नाव आणि चिन्ह सादर केले. निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला मशाल चिन्ह देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव वापरण्यास सांगितलं तर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह देत बाळासाहेबांची शिवसेना हे नाव वापरण्यास सांगितलं.

- Advertisement -

दरम्यान, भाजपाकडून मुरजी पटेल यांचं नाव जाहीर करण्यात आलं. मुरजी पटेल यांनी प्रचारालाही सुरुवात केली. शिंदे गटाने उमेदवार जाहीर न करता भाजपाला पाठिंबा दिला. तर, राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. म्हणजेच, या निवडणुकीत आता राष्ट्रीय पक्षांकडून दोन उमेदवार, नोंदणीकृत पक्षांचे तीन तर अपक्ष व इतर पक्षांचे नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. तसंच, शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनीही पत्र लिहून बिनविरोध निवडणुकीची विनंती केली होती. बिनविरोध निवडणुकीची मागणी वाढल्याने भाजपाच्या नेत्यांमध्ये काल मध्यरात्री बैठक पार पडली. ही निवडणूक व्हावी अशी स्थानिक नेत्यांची मागणी होती. परंतु, अंतिम निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आला. काहीच वेळापूर्वी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपा माघार घेत असल्याची घोषणा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आहे. मुरजी पटेलसह इतर उमेदवारांनीही आज अर्ज मागे घेतल्यास ऋतुजा लटके यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा होईल.

- Advertisement -

२०२४ ला अंधेरीत आम्हीच जिंकू

वरिष्ठ नेतृत्त्वाच्या बैठकीनंतर उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सहानुभूती आणि संस्कृती पाळली पाहिजे. आम्ही पळपुटे नाही. आम्ही लढाई लढायच्या ९१ टक्के परिस्थितीत आहोत. आम्ही पळपुटे नाही. २०२४ च्या निवडणुकीत अंधेरीत दिसेलच. २०२४ ला अंधेरीत पाहा. तेव्हा आम्हीच जिंकून येऊ. दिवंगत आमदाराच्या पत्नी लढत असल्याने परंपरा आहे, की आरोप-प्रत्यारोप होऊ नये म्हणून आम्ही ही काळजी घेतली.

हेही वाचा भाजपा अंधेरी पोटनिवडणूक लढवणार का? मध्यरात्री नेत्यांची खलबतं, बैठकीत काय ठरलं?

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे व त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे -:

१) ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)

३) बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

४) मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

५) चंदन चतुर्वेदी (अपक्ष)

६) चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)

७) निकोलस अल्मेडा (अपक्ष)

८) नीना खेडेकर (अपक्ष)

९) पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)

१०) फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

११) मिलिंद कांबळे (अपक्ष)

१२) राजेश त्रिपाठी (अपक्ष)

१३) शकिब जाफर ईमाम  मलिक (अपक्ष)

राज ठाकरे यांचे पत्र

एक विशेष विनंती करण्यासाठी हे पत्र आपणांस लिहितो आहे. आमदार कै रमेश लटके ह्यांच्या दुर्देवी निधनानंतर आज अंधेरी (पूर्व) ह्या विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक आहीर झाली आहे. तिथे त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके ह्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. कै. रमेश एक चांगले कार्यकर्ते होते. अगदी शाखा प्रमुखापासून त्यांची वाटचाल सुरू झाली. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मी एक साक्षीदार आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीनं आमदार होण्यानं कै. रमेश ह्यांच्या आत्म्यास खरोखर शांती मिळेल. माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षानं ती निवडणूक लढवू नये आणि त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके आमदार होतील हे पहावं.

हेही वाचा- राज ठाकरेंच्या पत्रावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले मी एकटा…

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -