घरमहाराष्ट्रBuldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा...

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बसचा भीषण अपघात; 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

Subscribe

Buldhana Bus Accident : बुलढाणा : नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा (Vidarbha Travels Bus) समृद्धी महामार्गावरील (Samriddhi Highway) बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. अपघातानंतर बस पलटी झाली, यावेळी प्रवासी बसच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने पेट घेतला आणि 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही आग इतकी भीषण होती की, बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचाव कार्यास सुरूवात केली आहे.  (Buldhana Bus Accident Bus accident on Samriddhi Highway in Buldhana 25 passengers died in the crash)

हेही वाचा – जुलैत राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार – देवेंद्र फडणवीस

- Advertisement -

विदर्भ ट्रॅव्हल्स ही खासगी बस नागपूरहून काल दुपारी 4 वाजता पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून 33 प्रवासी प्रवास करत होते. रात्री 1 ते दीडच्या सुमारास समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा येथे भीषण अपघात झाला. बस खांबाला धडकल्यानंतर दुभाजकाला धडकली आणि डाव्या बाजूला पलटी झाली. त्यामुळे दरवाजामधून बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे काही प्रवासी बसच्या काचा फोडून बाहेर पडले, मात्र इतर प्रवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना बसने अचानक पेट घेतला. त्यानंतर बसचे टायर फुटले आणि डिझेलच्या टाकीचा स्फोट झाला आणि आगीने रौद्ररूप धारण केले. यावेळी अनेक प्रवासी बसमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत होते, किंचाळत होते, पण त्यांना बाहेर पडता आले नाही. आग इतकी मोठी होती की, बसमधील प्रवाशांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

हेही वाचा – Honey Trap Case : प्रदीप कुरुलकरांच्या विरोधात 2 हजार पानांचे चार्जशीट दाखल

- Advertisement -

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्यास सुरुवात केली होती. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला आहे, तर बसमधील दुसरा चालक आणि वाहकासह सहा प्रवासी बचावले आहेत. बसमधील 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सध्या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावरील भीषण घटनेवर शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या अपघाताची चौकशी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत दुर्देवी आहे. मी याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत बोललो आहे. या अपघाताची चौकशी होणार असून जखमींवर तातडीचे उपचार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मृतांची ओळख पटवणे सुरू असून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -