महिला आयोगाच्या नोटिशीला चित्रा वाघ यांच्याकडून उत्तर; माझी हरकत…

Chitra Wagh | दोन दिवसांची मुदत संपण्याआतच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

chitra wagh reaction on sanjay rathod clean chit uddhav thackeray dilip walse patil

Chitra Wagh | मुंबई – उर्फी प्रकरणात चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल आयोगाने नोटीस बजावली होती. या नोटीशीला उत्तर न दिल्यास आयोगाकडून पुढील कारवाई होणार होती. मात्र, दोन दिवसांची मुदत संपण्याआतच भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली.

हेही वाचा – उर्फी प्रकरण चित्रा वाघ यांच्या अंगलट; राज्य महिला आयोगाकडून नोटीस

चित्रा वाघ म्हणाल्या की, महिला आयोगाचा कायम सन्मान. दिलंय नोटिशीचं उत्तर. मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं, दिलेली नोटीस वितरित केली तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. स्वैराचाराला लगाम घालणं ही फक्त माझीच जबाबदारी नाही, तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच.

हेही वाचा – पोस्टर नहीं, इधर लाईव्ह शो चल रहा है; चित्रा वाघ यांचा उर्फीवरून महिला आयोगावर निशाणा

खुल्या समाजात उघडा नंगानाच सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनंच असायला हवं, असा टोलाही चित्रा वाघ यांनी लगावला आहे.

हेही वाचा – अध्यक्ष म्हणजे आयोग नसतो, चित्रा वाघ यांचं चाकणकरांना प्रत्युत्तर

चित्रा वाघ यांनी महाराष्ट्र राज्य महिला आयोगावर ताशेरे ओढले होते. सार्वजनिक ठिकाणी उर्फी जावेद नंगानच करते, तरीही त्यावर महिला आयोग काहीही कारवाई करत नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला होता. अनुराधा या वेबमालिकेच्या पोस्टरवरून तेजस्विनी पंडित आणि संजय जाधव यांना नोटीस पाठवणारे महिला आयोग उर्फीविरोधात का कारवाई करत नाही, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला होता.


चित्र वाघ यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याकरता महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनीही ठाम भूमिका घेतली. एवढंच नव्हे तर, महिला आयोगाबाबत समाजात अविश्वास निर्माण केल्याबद्दल चित्रा वाघ यांनाच नोटीस बजावली होती. दोन दिवसांत नोटिशीचे उत्तर आले नाहीतर आयोग कायद्यानुसार पुढील कारवाई करेल, असं नोटीसीत म्हटलं होतं.

दरम्यान, महिला आयोगाला उत्तर मिळाल्यानंतर ते उत्तर महिला आयोग सार्वजनिक करतं का हे पाहावं लागणार आहे. तसंच, चित्रा वाघ यांनी याबाबत नेमकं काय उत्तर दिलंय याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.