घरमहाराष्ट्रलवकरच आणखी धक्के देऊ...; दादा भुसेंचा ठाकरे गटाला इशारा

लवकरच आणखी धक्के देऊ…; दादा भुसेंचा ठाकरे गटाला इशारा

Subscribe

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळी विधानसभेत निवडणुकीच्या रिंगणात लढण्याचे आव्हान दिल्यानंतर शिंदे गटातील नेत्यांनी त्यांच्या या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आदित्य ठाकरे यांना फटकारले आहे. तर ठाकरे गटाला आणखी धक्के मिळणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ठाकरे गटाचे युवानेते आमदार आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी एका सभेमध्ये बोलताना शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यांवर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिकमध्ये सध्या वसंत व्याख्यानमालेचे 100वे वर्ष साजरे करण्यात येत आहे. यावेळी बोलताना दादा भुसेंनी आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.

दादा भुसे यावेळी म्हणाले की, आदित्य ठाकरे हे एकीकडे सभा घेत आहेत. तर दुसरीकडे त्यांना मोठा धक्का बसत आहे. नाशिकमधील जवळपास 50 पेक्षा अधिक ज्येष्ठ शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला. हे असे धक्के सांगायचे नसतात. ठाकरे गटाला लवकरच आणखी धक्के देण्यात येतील. जुन्या काळातील शिवसैनिक आता शिंदे गटात येत आहेत. त्यांचे विचार, शिकवण तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

- Advertisement -

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय पुरुष
आमचे आजोबा चोरले हे म्हणणे मनाचा कोतेपणा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रीय पुरुष असून एका कुटुंबापुरते मर्यादित नाहीत. मग कोणीतरी म्हणेल की, आमचे छत्रपती शिवाजी महाराज चोरले, कोणी म्हणतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चोरले, कोणी म्हणतील महात्मा फुले चोरले, असे चालत नाही. म्हणून फक्त नावाने होत नाही तर महापुरुषांनी जी शिकवण दिली, ती शिकवण कार्यकर्त्याने अंगिकारणे महत्वाचे आहे. अशी शिकवण भाषणापुरती मर्यादित न ठेवता ती कृतीतून पुढे आली पाहिजे, असेही दादा भुसे यावेळी म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले की, ”एखाद्या कामामध्ये सुधारणा केली पाहिजे ते बोलले पाहिजे. हे सरकार चांगले काम करत असून सामान्यातल्या सामान्य माणसाचा विचार करून हे सरकार आपले काम करत आहे. याचा सर्वोच्च बिंदू येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना दिसून येईल,” असा विश्वास देखील भुसे यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – भाजपात आल्यानंतर त्यांनी चांगली संधी…; थोरातांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंचं मोठं विधान

तसेच, बाळासाहेब ठाकरेंची शिकवण उराशी बाळगून तळागाळातील शिवसैनिक काम करत आहे. त्यांच्या शिकवणुकीनुसार 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण लक्षात ठेवून काम केले जात आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये कुठेही फिरायला मुभा आहे, मनोगत असेल ते मांडणे हा सर्वस्वी ज्याचा त्याचा अधिकार आहे. तीन ते चार हजार शेतकऱ्यांचा कार्यक्रम करून आलो असून आम्ही सतत लोकांमध्ये राहतो, असेही यावेळी दादा भुसे यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -