“दाजीबा वीर मिरवणूक”; नाशिकची अनोखी परंपरा

भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. रंगांचा सण अशी होळीची ओळख असली तरी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात विविध प्रकारांनी होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण होळी, शिमगा, दोलायात्रा, होलिका उत्सव, हुताशनी, कामदहन आशा वेगवेगळ्या नावानेही ओळखला जातो. कोकणात याला शिमगो म्हणतात. याशिवाय वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त वसंतोत्सव असेही म्हटले जाते. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. संपूर्ण देशभरात विशेषतः उत्तर भारतात या सणाचे विशेष महत्व असले तरी महाराष्ट्रात हा सण साजरा करण्याची पद्धत स्थानपरत्वे वेगवेगळी आहे. आज धुलिवंदनानिमित्त नाशिकमध्ये वीर-दाजीबा मिरवणूक तर, सिन्नर तालुक्यातील वडांगळी गावात गाढवावरुन जावयाची मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. या परंपरांमुळे संपूर्ण आठवडाभर धामधूम दिसणार आहे…

नाशिक : शहरात होळीच्या दुसर्‍या दिवशी धुलिवंदनाला वीर दाजिबा मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. जुन्या नाशिक परिसरातील बाशिंगे वीर अशी या वीरांची ख्याती असून, विविध देवदेवतांच्या वेशभूषा ते करतात. तीनशे वर्षांपासूनच्या या परंपरेत डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेष धारण करून हे वीर मिरवले जातात.

ज्यांच्या घरात वीरांचे टाक आहेत त्यांनी जय्यत तयारी केली आहे. फाल्गुन वैद्य प्रतिपदेला दाजीबा महाराज बाशिंगे वीरांची कथा आहे. या धूलिवंदनाच्या दिवशी शहरामध्ये वीरांची मिरवणूक काढली जाते. देवादिकांंचे अवतार धारण करून हे वीर गंगाघाटावर वाजतगाजत मोठ्या थाटात मिरवले जातात. त्यातही अत्यंत प्रभावी असलेले ‘बाशिंगे वीर’ हे नागरिकांत प्रसिद्ध आहेत. दिंडोरी तालुक्यात जानोरी गाव आहे. तिथे सधन गवळी राहत. त्याने खंडेरावांची भक्ती करण्याचे अंंगी बाणले होते. त्याचा गाई-म्हशीचे दूध विकणे हाच व्यवसाय होता. काम झाल्यावर ईश्वरसेवा करायची असा त्याचा नित्यक्रम होता.

डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, गळ्यात सरी, हातात सोन्याचे कडे, पायात मारवाडी जोडा, कंबरेला धोतर असा बादशाही थाट असणारा हा जवान निधड्या छातीचा होता. वयाच्या 16 व्या वर्षी त्याला लग्नाची मागणी आली व 5 व्या मांडवी लग्न ठरले. लग्नाच्या 5 दिवस आधी अंगाला हळद लागते. काळाची चाहूल लागते न लागते तोच 7 ते 8 चोर त्याच्यावर चाल करतात. एका तासाच्या धूमश्चक्रीत चोरांकडून झालेल्या हल्ल्यातच त्याचा शेवट होतो. चोरटे माल घेऊन फरार होतात.

आपला धनी जमिनीवर घायाळ पडल्याचे पाहून त्याच्या सोबत असलेले कुत्रे दुपारची न्याहारीची गाठोडे घेऊन घरी परत येते. कुत्रे एकटेच आलेले पाहून लग्नघरची मंडळी घाबरून जातात. कुत्र्यावरही जखमा असतात. कुत्र्याला सर्व मंडळी घटनास्थळी पोहोचतात. त्यानंतर कुत्रेही प्राण सोडते. सर्वांना अतिशय दु:ख होते. याच ठिकाणी धन्याला मूठमाती देऊन सर्व घरी परततात. जीव जाताना लग्नाची मनापासूनची इच्छा मात्र अपुरी राहून जाते. मंडळी वेशीपासून आत येण्यास सुरुवात झाल्यावर एक विचित्र चमत्कार घडतो. महाराज ज्या ठिकाणी स्वत: खंडेरावाची पूजा करत असत त्या जागेवर त्यांची प्रतिमा पूर्ववत दिसू लागते व बोलू लागते की, जो कोणी माझी राहिलेली इच्छा पूर्ण करील त्याचे मी काम करेन. त्या महाराजांकडे कोणीही गार्‍हाणे सांगितल्यास त्यांचे निवारण होऊ लागला. नवरदेव बाशिंग लावून दरवर्षी आपल्या बायकोच्या शोधात फिरतोय. या फिरण्यात मात्र लोकांचेच राहिलेले प्रश्न सोडवितात, अशी त्यांची आख्यायिका आहे.