घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; चांदवडला टोल कर्मचारी अटकेत, वातावरण तणावपूर्ण

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; चांदवडला टोल कर्मचारी अटकेत, वातावरण तणावपूर्ण

Subscribe

नाशिक : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशीच मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड येथील मंगरूळ टोलनाक्यावरील एका कर्मचार्‍याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याची घटना घडली. या घटनेचे चांदवड शहरात पडसाद उमटले. त्यामुळे तणावमय परिस्थिती निर्माण झाली होती. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवार ते पोलीस ठाण्यापर्यंत भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत मोर्चा काढला. पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी संशयित शाहदाब कुरेशी यास ताब्यात घेतले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चांदवड टोलनाक्यावर स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रम सुरू असतानाच संशयित कुरेशी याने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. ही घटना पोलिसांना समजताच पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिकेत भारती पोलीस, उपअधीक्षक सोहेल शेख यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संशयित कुरेशीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

संशयित कुरेशी चांदवड येथील टोल नाक्यावर सुमारे सहा वर्षांपासून टी.सी. या पदावर कार्यरत आहे. मंगळवार (दि.१५) रोजी त्याने काही नागरिक व टोलकर्मचार्‍यांसमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. टोलनाका व्यवस्थापनाने त्यास निलंबित केले आहे. दरम्यान, याप्रकरणाची पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्याचा घोषणा देण्याचा काय उद्देश होता. या पाठीमागे अजून कोणी आहे का, यासह अनेक बाबींचा पोलीस तपास करीत आहेत. पुढील तपास चांदवडच्या प्रभारी पोलीस निरीक्षक सविता गर्जे व पोलीस अंमलदार धुमाळ करत आहेत.

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्वपक्षीय शेकडो कार्यकर्त्यांनी विश्रामगृहाच्या आवार ते पोलीस ठाण्यापर्यंत भारत माता की जय, वंदे मातरम् च्या घोषणा देत मोर्चा काढला. यानंतर संबंधित व्यक्तीला कठोर कारवाई करून त्याच्यावर देवद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय जाधव, भाजपचे आत्माराम कुंभार्डे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विकास भुजाडे, माजी नगराध्यक्ष भुषण कासलीवाल, निवृत्ती घुले, दत्तात्रय गांगुर्डे, भाजपचे तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, आमदार डॉ. राहुल आहेर यांचे स्विय सहाय्यक सागर आहिरे, पंकज निकम, रामेश्वर भावसार, तुषार झारोळे, अमोल बिरारी, संतोष बडादे, पंकज गोसावी आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -