उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख होतील, पण…, दीपक केसरकरांचे सूचक विधान

 

कोल्हापूरः आजही आम्हाला उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व मान्य आहे. पण त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत युती तोडावी, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात बंड करणाऱ्या अनेक आमदारांनी याआधीही अशाच प्रकारचे आवाहन केले आहे.

मंत्री केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आम्ही फसवले नाही. त्यांना आम्हाला निघून जाण्यास सांगितले आहे. हे कधीतरी जनतेला कळायला हवे. उद्धव यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट झाली होती. त्यानंतर कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जात हिंदुत्त्वाचा विचार सोडल्याची चूक केल्याचे उद्धव यांनी कबूल केले होते. ही चूक सुधारु असा शब्द उद्धव यांनी दिला होता. मात्र त्यांनी शब्द पाळला नाही. उद्धव यांनीच जनतेची फसवणूक केली आहे. तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसनेच उद्धव ठाकरे यांना फसवलं आहे, असा आरोप मंत्री केसरकर यांनी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने श्री अंबाबाई मंदिराच्या कामांना सुरुवात केली आहे. या कामांची पाहाणी मंत्री केसरकर यांनी केली. त्यानंतर मंत्री केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांना कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडण्याचे आवाहन केले. मंत्री केसरकर यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. कोणाला खोके खोके म्हणता, खोक्यांबरोबर खेळायची सवय लहानपणापासूनच आदित्य ठाकरे यांना आहे. आम्हाला नाही. जनता आमच्या सोबत आहे, असा दावाही मंत्री केसरकर यांनी केला.

पुढे मंत्री केसरकर म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी कोकणचा निधी २५ कोटींपर्यंत कमी केला. त्यावेळी आदित्य हसत होते. त्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. आदित्य यांची कोकणाबद्दलची आस्था समोर आली पाहिजे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणावर अन्याय केला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी कोकणसाठी साडे तेराशे कोटी दिले. दोनशे कोटी काजू महामंडळासाठी दिले. बाळासाहेबांनी कोकणातील माणसांच्या जोरावर शिवसेना उभी केली. त्याच कोकणला दिलेले ४५० कोटी अजित पवार यांनी काढून घेतले. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा २५० कोटींचा नियोजन आराखडा १५० कोटी केला. तेव्हा उद्धव ठाकरे का नाही बोलले, असा सवाल दीपकर केसरकर यांनी केला आहे.