घरमहाराष्ट्रप्रत्येक तालुक्यात डायलिसीस सेंटर, सेंट जॉर्ज रुग्णालयातही केमोथेरेपी

प्रत्येक तालुक्यात डायलिसीस सेंटर, सेंट जॉर्ज रुग्णालयातही केमोथेरेपी

Subscribe

महाराष्ट्रात लवकरच सर्व तालुक्यांमध्ये डायलिसीस सेंटर सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यात ज्या तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालय आहे, अशा तालुक्यांत हे सेंटर सुरू होणार आहे. तर पुढील वर्षी राज्याच्या सर्व ३५६ तालुक्यांमध्ये डायलिसीस सेंटर सुरु होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी दरम्यान आरोग्य मंत्री टोपे यांनी अर्धांगवायू, कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजना सांगितल्या.

पक्षाघातावर नियंत्रण आणण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन मशीन देणार असल्याचेही टोपे यांनी सांगितले. यामुळे रक्तात गाठ आहे का? हे कळू शकेल आणि त्या माध्यमातून पक्षघातासारखे आजार टाळता येतील, अशी अपेक्षा टोपे यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

स्थानिक पातळीवरच केमोथेरपीची सुविधा

तसेच, कर्करोगाबाबत राज्य सरकार दक्ष असून कर्करोगाचे पहिल्या टप्प्यातच निदान व्हावे, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कर्करोगावर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी सुविधा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून सध्या ११ जिल्ह्यांत केमोथेरपी सुविधा सुरू करून देण्यात येत आहे. आणखी सहा जिल्ह्यात केमोथेरपीची सुविधा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात एकूण १७ जिल्ह्यातील रुग्णांना केमोथेरपीसाठी स्थानिक पातळीवरच सुविधा उपलब्ध होईल, असे टोपे यांनी सांगितले. तसेच मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात केमोथेरेपीची सुविधा देण्यासाठी विचार करु, असेही टोपे यांनी सांगितले.

हाफकिनच्या जागेवर धर्मशाळा बांधणार

काँग्रेसच्या हुस्नबानो खलिफे यांनी हाफकिनच्या ५ एकर जागेवर टाटा कॅन्सर रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा उभारण्याची मागणी केली. यावर महिन्याभरात धर्मशाळा बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन टोपे यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -