…म्हणून उद्धव ठाकरेंनी नेत्यांची भाषणे बंद केली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप

 

खेडः रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांच्या भाषणांना टाळ्या पडायच्या. म्हणून त्यांची भाषणे उद्धव ठाकरे यांनी बंद केली, असा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केला.

रत्नागिरी खेड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, बाळासाहेब हे नेहमी कार्यकर्त्यांच्या पाठिशी उभे राहिले. पण तुम्ही कार्यकर्ता संपवण्याचा प्रयत्न करता. पण लक्षात ठेवा. कार्यकर्ता मोठा झाला की पक्ष मोठा होतो. रामदास कदम आणि गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला टाळ्या पडायच्या. म्हणून तुम्ही त्यांची भाषणे बंद केली, असा आरोप मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

मनोहर जोशी यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याला तुम्ही स्टेजवरुन खाली उतरवलत. बाळासाहेब असते तर त्यांनी असं केलं असतं का?, असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. षण्मुखानंदच्या कार्यक्रमाला येऊ नकोस असं मी रामदास कदमला सांगितलं. त्या कार्यक्रमात कदम यांचा मनोहर जोशी करणार होते. त्यांनाही मनोहर जोशी यांच्या सारखं स्टेजवरून खाली उतरवणार होते. असा कोणता पक्षप्रमुख असतो जो आपल्याच पक्षातील नेत्याला संपवण्यासाठी दुसऱ्या पक्षाची मदत घेतो, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका केल्याची काही भाषणे सभेत दाखवण्यात आली. तुम्ही शरद पवार आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका केलीत. ते तुम्हाला आज कसे चालतात. पक्षातील अनेकजण घरादाराची पर्वा न करता तुमच्या सोबत आले. तुम्ही त्या नेत्यांना गद्दार म्हणता. माझ्यावर १०९ केसेस आहेत. तुम्ही काय केलतं, असा सवालही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला.

मुंबई गोवा महामार्गाची एक मार्गिका लवकरच सुरु होईल. मी कोकणासाठी भरीव निधी दिला आहे. कोकणाला काही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.