घरताज्या घडामोडीविनयभंग प्रकरणात नरेंद्र मेहतांवर तात्काळ कारवाई करा - डॉ. नीलम गोऱ्हे

विनयभंग प्रकरणात नरेंद्र मेहतांवर तात्काळ कारवाई करा – डॉ. नीलम गोऱ्हे

Subscribe

भाजपचे मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता हे महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याची तक्रार महिला नगरसेविकेने केली होती. त्यानंतर आज विधानपरिषदेत या घटनेचे पडसाद उमटले. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी या प्रकरणावर प्रश्न उपस्थित करत माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांचे पेन्शन बंद करण्याची मागणी केली. तर उपसभापती निलम गोर्‍हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना निर्देश दिले की या प्रकरणी पीडित नगरसेविकेने या आधी दोनदा तक्रार दाखल केलेली आहे त्याची दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी.

नगरसेविकेने माजी आमदाराविरोधात लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आरोपांनंतर नरेंद्र मेहता गायब झाले होते. मात्र रात्री १२ वाजता पोलीसांनी त्यांचे स्टेटमेंट घेतलेले आहे, अशी माहिती गृहमंत्री देशमुख यांनी दिली. मात्र पीडित नगरसेविकेने अद्याप तक्रार दाखल केलेली नाही. आज मीरा भाईंदर मनपातील महापौर पदाची निवडणूक झाल्यानंतर त्या गुन्हा दाखल करणार असल्याचे देशमुख म्हणाले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

- Advertisement -

मात्र देशमुख यांच्या उत्तरावर उपसभापती निलम गोर्‍हे यांनी आक्षेप घेतला. जुलै २०१९ मध्ये पीडितेने तक्रार दाखल केली होती. तसेच २०१६ मध्ये नोटराईज करुन आपले स्टेटमेंट दिले होते. मात्र तेव्हा मेहता यांच्यावर कारवाई झाली नाही. उलट मेहता विधानसभेत कसे चांगले काम करतात? याचे दाखले देत होते. उपसभापती म्हणून माझे गृहखात्याला निर्देश आहेत की, जुन्या तक्रारीची दखल घेतली जावी, असे उपसभापती निलम गोर्‍हे यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेच्या मनिषा कायंदे, राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर देशमुख यांनी माजी आमदार असले तरी त्यांना पाठिशी घातले जाणार नाही, असे सांगितले. तर भाजपचे आमदार निरंजन डावखरे म्हणाले की, कोणत्याही एका पक्षात असे आरोपी नसून प्रत्येक पक्षातील नेत्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मेहता भाजपचे आहेत हे न पाहता ते आरोपी असतील तर त्यांच्यावर कारवाई करावी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -