राज्यपालांचं उद्धव ठाकरेंना पत्र, उद्धव गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत

उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि सांगू शकतो की, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आला नाही, तर बहुमत सिद्ध करण्यास कसं काय सांगू शकता?, असंही उद्धव ठाकरेंच्या गटाकडून सांगितलं जात आहे

मुंबईः महाराष्ट्रातील राजकीय पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर उद्या फ्लोअर टेस्ट होणार आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उद्धव सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे काही वेळापूर्वी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांसह कामाख्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, मी उद्या फ्लोअर टेस्टसाठी मुंबईला जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी वेगवान झाल्या आहेत.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या (30 जूनला) सकाळी 11 ते 5 यावेळेत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणारे पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी फ्लोअर टेस्टसाठी बोलावल्यामुळे उद्धव गटानं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. यामागे उद्धव गटाचा युक्तिवाद असा आहे की, बंडखोर आमदारांच्या अपात्रतेला सर्वोच्च न्यायालयानेच 11 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. अशा स्थितीत राज्यपालांनी फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो आणि सांगू शकतो की, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय आला नाही, तर बहुमत सिद्ध करण्यास कसं काय सांगू शकता?, असंही उद्धव ठाकरेंच्या गटाकडून सांगितलं जात आहे.

माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली आणि फ्लोअर टेस्टची मागणी केली. मात्र, राज्यपालांनी याबाबत अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नव्हती. परंतु राजभवनानं आज पत्र काढत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे निर्माण झालेल्या राजकीय संकटात आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर आता भारतीय जनता पक्ष सक्रिय होताना दिसत आहे. काल रात्री दहाच्या सुमारास फडणवीस राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत आम्ही राज्यपालांना पत्र सादर केले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना सांगितले होते. आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेत त्यांचे बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी विनंती केली, असंसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलं.

भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आज आम्ही राज्यपालांना ई-मेलद्वारे पत्र दिले असून, त्यात थेट असे म्हटले आहे की, राज्यात जी परिस्थिती दिसत आहे, त्यात शिवसेनेचे 39 आमदार राज्याबाहेर आहेत. आम्हाला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये राहायचे नाही, असे म्हणत आहेत. ते म्हणाले, “याचा अर्थ हे 39 आमदार सरकारसोबत नाहीत किंवा त्यांना महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा नाही, असे आम्ही राज्यपालांना सांगितले आहे. सरकार अल्पमतात असल्याचे दिसत असल्याने तातडीने फ्लोअर टेस्टसाठी सरकारला निर्देश द्यावेत, अशी सूचनाही राज्यपालांकरवी मुख्यमंत्र्यांना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींनी जारी केलेल्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात बंडखोर शिवसेना आमदारांना दिलासा देत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी संबंधित आमदारांच्या अपात्रतेबाबत 11 जुलैपर्यंत निर्णय घेऊ नये, असे सांगितले होते. न्यायालयाने विधानसभेत फ्लोअर टेस्ट न घेण्याची विनंती केलेल्या महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यासही नकार दिला होता. सुमारे 40 बंडखोर शिवसेना आमदार आणि किमान 10 अपक्ष आमदार अडीच वर्षांचे महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात आसाममधील गुवाहाटीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये तळ ठोकून आहेत.


हेही वाचाः उद्या मुंबईत येऊन फ्लोअर टेस्ट करणार, एकनाथ शिंदेंची माहिती