महिलेला मारहाण करणाऱ्या BJP पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची माहिती

HM dilip Walse Patil warn case will be filed against the BJP office bearer who assaulted the woman
महिलेला मारहाण करणाऱ्या BJP पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होणार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचे विधान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुणे दौऱ्यावर असताना राष्ट्रवादीने महागाईवरुन आंदोलन केलं होते. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपच्या कार्यकर्त्याने महिला कार्यकर्त्यांवर हात उगारला असल्याची घटना यावेळी घडली आहे. ज्यांची चूक असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, चूक कोणाची आहे, जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यावंरसुद्धा गुन्हा दाखल होईल. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची चूक असेल तर त्यांच्यावरसुद्धा गुन्हा दाखल होईल. ज्यांची चूक असेल, भाजपच्या पुरुष पदाधिकाऱ्यांनी महिलांवर हात उगारणे किंवा महिलांना मारहाण करणं ही अतिशय आक्षेपार्ह अशी बाब आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर जी कारवाई अभिप्रेत आहे. ती कारवाई होईल असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण ?

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या उपस्थितीत अमित शाहांच्या पुस्तकाचे प्रकाशन बालगंधर्व रंगमंदिरात झाले. यावेळी वाढत्या महागाईवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. त्यामुळे इराणी यांच्या कार्यक्रमात गोंधळ निर्माण झाला. घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि बालगंधर्व रंगमंदिरातून बाहेर नेले. परंतु यावेळी एका भाजप कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे. या घटनेचा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मृती इराणींच्या ताफ्यावर अंडी फेकण्याचा प्रयत्न

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत तीव्र निदर्शने केली. यानंतर त्यांचा ताफा परत जात असताना त्यांच्या वाहनांवर अंडी फेकण्याचा प्रयत्न झाला. परिसरातून भाजपचे कार्यकर्तेही मोदी मोदीच्या घोषणा देत बालगंधर्व रंगमंदिराकडे चालत गेले. त्यामुळे काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.


हेही वाचा : महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडणार? राष्ट्रवादीवरील आरोपानंतर नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य