पोपट मेलाय की जिवंत? हे माहीत नाही; पण ‘शिंदे आनंद’ घेतायत…

मुंबई : लोकगीत गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या एकेकाळी गाजलेल्या ‘जवा नवीन पोपट हा…’ या गाण्याची सध्या अनेकांना आठवण होत आहे. कारण सध्या राजकारणात हा ‘पोपट नव्याने’च घुसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांच्यात पोपटाचा संदर्भ देत वार-पलटवार केला जात आहे. विशेष म्हणजे, या कलगीतुऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मात्र आनंद घेत आहेत.

सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने आपले सरकार संवैधानिक असल्यावर शिक्कामोर्तब केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तर, ठाकरे गटासह महाविकास आघाडीने हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘खोके सरकार’ असलेले शिंदे-फडणवीस सरकार आता ठाकरे गटाच्या दृष्टीने ‘बेकायदेशीर सरकार’ झाले आहे.

यात आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो, 16 आमदारांच्या अपात्रतेचा! हे आमदार अपात्र ठरतील, असे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. दोनच दिवसांपूर्वी यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘पोपटा’चा संदर्भ दिला. 16 आमदार अपात्र ठरतील की नाही, यावर मी भाष्य करणार नाही. हा विषय विधानसभा अध्यक्षांकडे आहे. पण पोपट मेला आहे. तो मान हलवत नाही. हात-पाय हलवत नाही, हे मविआला माहिती आहे. तथापि, त्यांनाही त्यांच्या लोकांना काही तरी सांगावे लागते. त्यामुळे ते अजूनही आशेवर आहेत, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली होती.

शिंदे गटाचा पोपट मेला आहे आणि फक्त विधानसभा अध्यक्षांनी ते घोषित करायचे आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगेच दुसऱ्या दिवशी प्रत्युत्तर दिले. तर, आज, गुरुवारी फडणवीस यांनी पुण्यात सांगितले की, पोपट कधीच मेला आहे, हे आता उद्धव ठाकरे यांनी मान्य करावे. आमचे सरकार संवैधानिक आहे. कायद्याच्या चौकटीतच स्थापन झाले आहे. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार आहे. परत निवडूनही येणार आहे, असा दावा फडणवीस यांनी केला.

भाजपाच्या तुलनेत संख्याबळ कमी असतानाही मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवारही होती. पण यातून सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रियाही दिली. आता भाजपा आणि ठाकरे गटात, पोपट मेलाय की जिवंत? असा वाद रंगला असताना, ‘शिंदे आनंद’ घेत असल्याचे चित्र आहे.