घरमहाराष्ट्रसीमावादावर तोडगा निघेपर्यंत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री..., पृथ्वीराज चव्हाणांचा अजब सल्ला

सीमावादावर तोडगा निघेपर्यंत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री…, पृथ्वीराज चव्हाणांचा अजब सल्ला

Subscribe

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मध्यस्थी केली असली तरी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी याबाबत वक्तव्य करून पुन्हा त्याला हवा दिली आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद उमटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक अजब सल्ला दिला आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करू नये, असे निर्देश अमित शहा यांनी या बैठकीत दिले.

- Advertisement -

मात्र तरीही, हा वाद धुमसतोच आहे. सोमवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावमधील मेळाव्याला कर्नाटक पोलिसांनी परवानगी नाकारली तर, महाविकास आघाडीने बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काल महाराष्ट्राला इंचभरही जमीन देणार नाही, याबाबत कर्नाटक विधानसभा आणि विधान परिषदेत ठराव मांडण्यात येणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राविरोधात गरळ ओकतात, तरीही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भूमिका घेत नाही. तुम्ही दिल्लीत गेलात तेव्हा तुम्हाला गुंगीचं इंजेक्शन देऊन पाठवले का, की बोलायचे नाही या विषयावर. तसे असेल तर स्पष्ट सांगा, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने तिथेही याचे पडसाद उमटले. असाच ठराव विधिमंडळात मांडण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या बाजूने निकाल देईल, ही भीती वाटत असल्यानेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई अशा प्रकारची प्रक्षोभक वक्तव्ये करीत आहेत, असा दावा करून माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी अजबच सल्ला दिला आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांमध्ये काय चर्चा झाली, हे अ्दयाप कोणाला समजलेले नाही. सीमावादात तोडगा निघत नाही, तोपर्यंत या दोन्ही मुख्यमंत्र्यांना एका खोलीत बंद करायला पाहिजे. असे केले तरच यातून मार्ग निघेल, असे ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -