BMC Budget 2022 : यंदाचा अर्थसंकल्प लोकाभिमुख आणि विकासाभिमुख – किशोरी पेडणेकर

Mumbai mayor kishori pednekar slams bjp and chitra wagh on animal english name

महापालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी आज दि. ०३ फेब्रुवारी २०२२ रोजी स्थायी समितीला सादर केलेला ४५ हजार ९४९. २१ कोटींचा अर्थसंकल्प हा लोकाभिमुख व विकासाभिमुख असून या अर्थसंकल्पात मुंबईतील पायाभूत सुविधा तसेच अनेक विकास प्रकल्पांसाठी महत्त्वपूर्ण आर्थिक तरतूद केली असल्याचे प्रतिपादन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले. मुंबईतून सर्वात जास्त महसूल केंद्र सरकारला मिळत असल्यानंतरही केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात मुंबईच्या तोंडाला पाने पुसली. परंतु बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी आर्थिक तरतूद केली आहे.

मागील वर्षी ३९ हजार ०३८.८३ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. महापालिका आयुक्त डॉ.इक्बाल सिंह चहल यांनी महापालिकेच्या महत्वाच्या ३१ प्रकल्पांसाठी १७ हजार ९४२ कोटींची भरीव तरतूद केली आहे. मुंबईत जन्मलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांना सर्वसामान्य मुंबईकरांच्या विकासाचा असलेला ध्यास या अर्थसंकल्पात प्रतिबिंबित होत असल्याचे महापौरांनी सांगितले.

नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी याकरिता हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आरोग्य केंद्र (आपल्या घराशेजारी) ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी सुमारे ४०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांना घराशेजारी प्रतिबंधात्मक व प्राथमिक उपचार सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. यातून मुंबईकरांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिली असल्याचे लक्षात येते.

शिव योग केंद्र :

योगाद्वारे चांगले आरोग्य

आजार झाल्यानंतर उपचारात्मक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याच्या दृष्टीकोनातून शिव योग केंद्रासारखे उपक्रम सुरु करण्यात येणार आहेत.

प्रोटॉन थेरपी

कर्करोगावरील उपलब्ध अद्ययावत उपचार प्रणालीपैकी एक प्रोटॉन थेरपी या सुविधेची उभारणी टाटा कर्करोग रुग्णालय यांच्या सहकार्याने मुंबईमध्ये उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. पर्यावरण खात्याचा एक भाग म्हणून हवामान कृती कक्षाची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विविध खात्यांना हवामान कृती आराखड्याकरता संबंधित खात्याच्यावतीने पुरेशी तरतूद करण्यात आली आहे.

महापालिकेच्या जकात नाक्यांवर परिवहन आणि व्यवसायिक केंद्राची उभारणी प्रस्तावित असून गिरगांव चौपाटीवरील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागी मराठी नाट्य विश्व संग्रहालयाची निर्मिती करण्यात येणार आहे. घाटकोपरमध्ये कर्मवारी भाऊराव पाटील वेल्फेअर सेंटरचा विकास असो की वरळीच्या धर्तीवर उपनगरात विक्रोळीत इंजिनिअर हब असो यातून मुंबईचा चौफेर विकास व “महापालिका प्रशासन आपल्या दारी ” याचे प्रतिबिंब अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळते.तसेच रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी टनेल धुलाई केंद्र, बेस्ट उपक्रमाला ८०० कोटींचे अर्थसहाय्य, मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पांसाठी ३२०० कोटी रुपये, गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी १३०० कोटी रुपये, मिठी नदीचे पुनरुज्जीवन आणि पूर नियंत्रणाकरिता ५६५.३६ कोटी रुपये, दहिसर,पोईसर, ओशिवरा अणि वालभट नद्यांचे पुनरुज्जीवन करता २०० कोटी रुपये, सफाई कामगारांच्या आश्रय योजनेसाठी १४६०.३१ कोटींची तरतूद,उद्यान विभागासाठी १४७.३६ कोटी रुपयांची तरतूद, वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाकरीता ११५.४६ कोटींची तरतूद,मुंबई अग्निशमन दलाकरीता ३६५.५४ कोटींची तरतूद, बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा प्रकल्पांतील ऊर्जा प्रकल्पासाठी १० कोटींची तरतूद,पाणी पुरवठा प्रकल्पांकरीता १०५९.६६ कोटींची तरतूद या महत्वपूर्ण कामांचा समावेश या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आला आहे.


हेही वाचा : Nitesh Rane: पाच तासांच्या चौकशीनंतर नितेश राणे यांना घेऊन पोलीस गोव्यात दाखल