घरमहाराष्ट्रबड्या व्यक्तींच्या गाड्यांना अपघात, सर्वसामान्यांचं काय?

बड्या व्यक्तींच्या गाड्यांना अपघात, सर्वसामान्यांचं काय?

Subscribe

मुंबई : महाराष्ट्रासह देशात बड्या नेत्यांच्या अपघाताचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या काही दिवासांत उद्योगपतींपासून राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांच्या गाड्यांचे अपघात झाले आहेत. त्यात काहीजण थोडक्यात बचावले तर, काहींनी आपला जीव गमावला. बड्या व्यक्तींच्या गाड्यांना जर अशाप्रकारे अपघात होत असतील सर्वसामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या तीन महिन्यांत बड्या व्यक्तींच्या अपघाताच्या किती घटना घडल्या जाणून घेऊ…
महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आरिफ नसीम खान यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना काल नांदेडमध्ये घडली. नसीम खान हे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेसाठी हैदराबादहून नांदेडच्या दिशेने जात होते. त्यावेळी नांदेडच्या भिलोली टोलनाक्यावर हा अपघात झाला. या अपघातात नसीम खान यांच्या पायाला दुखापत झाल्याचे समजते.

आमदार नितेश राणे

भाजपा नेते आमदार नितेश राणे यांच्या गाडीला 6 सप्टेंबर रोजी पुण्यात अपघात झाला होता. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यानजीक झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नव्हते. अपघातावेळी गाडीमधून नितेश राणे यांच्यासह त्यांच्या पत्नी, मुलं, नातेवाईक प्रवास करत होते. पाठीमागून येणाऱ्या एका ट्रकने राणे कुटुंबीयांच्या गाडीला जोरदार धडक दिली होती. ज्यामुळे हा अपघात घडला होता.

- Advertisement -

खासदार हिना गावित

याआधी 8 ऑगस्ट रोजी नंदुरबारच्या खासदार हिना गावित एका खासगी पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी जात असताना त्यांच्या कारचाही भीषण अपघात झाला होता. या अपघातात हिना गावित यांच्या नाकाला किरकोळ दुखापत झाली होती, तर काही कार्यकर्तेही जखमी झाले होते. नंदुरबार शहरातील गुरव चौक येथे हा अपघात झाला होता.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्याला दोनदा अपघात

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील वाहनांना दोनदा अपघात झाला. 5 जूनला मुख्यमंत्री शिंदे मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यासाठी जात असताना त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एका वाहनाला महापालिका मुख्यालयानजीक अपघात झाला होता. या अपघातात दोन वाहनांचे नुकसान झाले होते. मात्र मख्यमंत्र्यांसह सर्वजण सुरक्षित होते. तर, 17 जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री राजभवनावर गेले होते. राजभवनहून वर्षा निवासस्थानी परतताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. एक भरधाव कार मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यात येऊन घुसली. मात्र ताफ्यातील वाहनचालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबवली. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मलबार हिलवरील (Malabar Hill) रस्त्यावर हा प्रकार घडला होता.

- Advertisement -

दोघांनी गमावले जीव

या सर्व घटनांमध्ये सुदैवाने मान्यवरांचे जीव बचावले. मात्र 14 ऑगस्ट रोजी झालेल्या एका कार अपघातात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा मृत्यू झाला. मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्यामध्ये पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात विनायक मेटे यांच्या डोक्याला, हाताला गंभीर दुखापत झाली होती. आयसीयूमध्ये उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. एका मोठ्या भरधाव ट्रकची मेटे यांच्या कारला जोरधार धडक बसल्याने हा अपघात झाला.

या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोवर, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा 4 सप्टेंबर रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील पालघरच्या चारोटी येथे त्यांच्या कारला अपघात झाला. त्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री हे अहमदाबादहून मुंबईला जात असताना भरधाव वेगात असेलेली त्यांची कार दुभाजकाला धडकली. सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला तेव्हा त्या गाडीत 4 जण उपस्थित होते; त्यातील 2 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सर्वसामान्यांना वाली कोण?

एकूण या घटनांमधून राज्यातील बड्या व्यक्तींचाच रस्ते प्रवास असुरक्षित असल्याचे चित्र उघड आहे, तर यात सर्वसामान्य नागरिकांचा विचार न केलेलाच बरा आहे. मागील काही महिन्यांत सर्वसामान्यांना बसप्रवासही जीवघेणा ठरतोय. सप्टेंबर-ऑक्टोबर या दोन महिन्यांत राज्यातील 50 हून अधिक जणांनी बसप्रवासादरम्यान आपला जीव गमावला आहे. नाशिक, पुणे यांसारख्या जिल्ह्यात सर्वाधिक घटना समोर आल्या.


सूनबाईंच्या विजयी वाटचालीवर रमेश लटकेंचे वडीलांना आली लेकाची आठवण म्हणाले….

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -