घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 10 हजार 652 मतदान केंद्र

Lok Sabha 2024 : पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांसाठी 10 हजार 652 मतदान केंद्र

Subscribe

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मुंबई : महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. 19 एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण 10,652 मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून या निवडणुकीत 95,54,667 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी बॅलेट युनिट (बीयु) 21,527 तर कंट्रोल युनिट (सीयु) 13,963 आणि 14,755 व्हीव्हीपॅट उपलब्ध असून 97 उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके उपस्थित होते. (Lok Sabha 2024 10 thousand 652 polling stations for the first phase of polling)

चोक्कलिंगम म्हणाले की, पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत एकूण 97 उमेदवार लढत आहेत. या निवडणूकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन (Randomization) करून त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच गडचिरोली मतदारसंघात सात हॅलिकॉप्टर पाठविण्यात आले आहेत. यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे, असे आवाहन चोक्कलिंगम यांनी यावेळी केले आहे.

- Advertisement -

मतदान केंद्र सुरक्षेसह सज्ज (Polling station equipped with security)

मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅटची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचेही रॅण्डमायझेशन (Randomization) झाले आहे. या पाच लोकसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय कमिशनिंग (Commissioning) करण्यात येत आहे. संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये सीआरपीएफ (CRPF) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

दिव्यांग व ज्येष्ठांसाठी विशेष सुविधा (Special facilities for disabled and senior citizens)

85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी रॅम्पची व व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ईटीपीबीएसद्वारे एकूण 9,416 मतदार तर 12डी या अर्जाद्वारे 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग असे एकूण 6,630 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच मतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे. गडचिरोली-चिमुर (अज) या लोकसभा मतदार संघातील आमगांव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी या चार विधानसभा मतदारसंघात व भंडारा-गोंदिया या लोकसभा मतदार संघातील अर्जुनी मोरगांव एका विधानसभा मतदारसंघात अशा एकूण पाच विधानसभा क्षेत्रामध्ये मतदानाची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे.

- Advertisement -

मतदानाच्या 48 तास आधी प्रचारास बंदी

मतदान संपण्याच्या वेळेच्या 48 तास आधी पाचही लोकसभा मतदार संघामध्ये सायलन्स पिरियड (Silence Period) आहे. या लोकसभा क्षेत्रामध्ये 48 तास आधी प्रचार करता येत नाही. तसेच या मतदार संघातील रहिवासी नसलेली व्यक्ती राजकीय प्रचारासाठी या क्षेत्रात राहू शकत नाही, असे आयोगाचे निर्देश आहेत. राज्यातील पहिल्या टप्प्यातील 5 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सर्व तयारी झालेली आहे. या पाच लोकसभा मतदार संघातील निवडणूकांमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान करण्यासाठी सर्व मतदारांनी पुढे येण्याचे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून करण्यात येत आहे.
मतदान करण्याबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन वोटर गाईड देण्यात आले आहे. मतदारांना मतदार वोटर स्लिप उपलब्ध करून दिल्या आहेत. इपीआयसी (EPIC) व्यतिरिक्त कोणते दस्तऐवज मतदानासाठी वापरता येतील, याबाबत वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी मतदान केंद्रे आवश्यक सोयी-सुविधांसह सुसज्ज आहेत.

प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action)

कायदा व सुव्यवस्थांतर्गत 11 एप्रिलपर्यंत 43,893 शस्रास्रे जमा करण्यात आलेली आहे. तर परवाने रद्द करून 723 शस्रे जप्त करण्यात आलेली आहेत. राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी (CRPC) कायद्यांतर्गत 70,967 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. राज्यामध्ये दि. 1 मार्च ते 11 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे 39.10 कोटी एकूण रोख रक्कम तर 27.18 कोटी रुपयांची दारु जप्त करण्यात आली. मौल्यवान धातू 63.82 कोटी रुपये, ड्रग्ज 212.82 कोटी, फ्रिबीज 0.47 कोटी आणि इतर बाब अंतर्गत 78.02 कोटी रुपये अशा एकूण 421.41 कोटी रक्कमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

18722 तक्रारी निकाली (18722 complaints resolved)

16 मार्च ते 13 एप्रिल 2024 या कालावधीत राज्यभरात सी व्हिजील ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या 2337 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील 2331 (99.63 टक्के) तक्रारी निकाली काढण्यात आलेल्या आहेत. तसेच याकालावधीत एनजीएसपी पोर्टलवरील 19018 तक्रारीपैकी 18722 निकाली काढण्यात आलेल्या आहेत.

जाहिरात पूर्व प्रमाणिकरणाचे 54 प्रमाणपत्र वितरित (54 certificates of advertisement pre-certification distributed)

राजकीय पक्षामार्फत प्रचार प्रसिद्धीकरिता इलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत दिल्या जाणाऱ्या जाहिरातीचे ऑडियो-व्हिडियो/ संदेश यांचे पूर्व प्रमाणिकरण करण्यासाठी राज्यस्तरीय माध्यम प्रमाणिकरण समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे जाहिरातीच्या पूर्व प्रमाणीकरणासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या अनुषंगाने 54 प्रमाणपत्रे देण्यात आलेली आहे.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -