घरमुंबईMumbai Fire : मालाड येथे आठ मजली इमारतीला आग; 14 जखमी, ज्येष्ठ...

Mumbai Fire : मालाड येथे आठ मजली इमारतीला आग; 14 जखमी, ज्येष्ठ नागरिकांची समावेश

Subscribe

मालाड (पश्चिम) येथे गिरनार गलॅक्सी या तळमजला अधिक आठ मजली इमारतीमध्ये तळमजल्यावरील वीज मीटर कॅबिनमध्ये लागलेल्या आगीमुळे 14 जण जखमी झाले आहेत.

मुंबई : मालाड (पश्चिम) येथे गिरनार गलॅक्सी या तळमजला अधिक आठ मजली इमारतीमध्ये तळमजल्यावरील वीज मीटर कॅबिनमध्ये लागलेल्या आगीमुळे 14 जण जखमी झाले आहेत. यामध्ये काही ज्येष्ठ नागरिकांची समावेश आहे. आगीत तिघेजण 10 ते 60 टक्के भाजले आहेत. उपचाराने बरे वाटल्याने 6 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून आठ जण अद्यापही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैकी दोघांना ऐरोली येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. (Fire breaks out in an eight-storey building in Malad 14 injured)

प्राप्त माहितीनुसार, मालाड (पश्चिम), सुंदर लेन, अंकल किचन जवळील गिरनार गलॅक्सी या तळमजला अधिक आठ मजली इमारतीमध्ये तळमजल्यावरील वीज मीटर कॅबिनमध्ये आज सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागल्याची घटना घडली. या आगीमुळे इमारतीमध्ये आणि परिसरात एकच खळबळ उडाली. सदर इमारतीमध्ये आग लागल्याने ज्येष्ठ नागरिक अडकले होते. त्यांच्या नाकातोंडात आगीचा धूर गेला. या आगीत 8 जण जखमी झाले असून त्यातील तिघेजण 10 ते 60 टक्के प्रमाणात भाजले आहेत.

- Advertisement -

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेवून बचावकार्य हाती घेतले होते. या आगीत जखमी झालेल्या आठ जणांना तत्काळ बाहेर काढून नजीकच्या रुग्णालयात पाठविण्यात आले. या आगीत जखमी १४ जणांपैकी, लेविना मुकादम (73) आणि अँथोनी फर्नांडिस (68) या जखमींना ऐरोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, मार्शल मुकादम (80), विनीजॉय मुकादम (40) आणि मर्सी गिनी जोसेफ (66) 10 ते 60 टक्के भाजले आहेत. या तिघांना शताब्दी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर उर्वरित 9 जखमींपैकी, मार्गारेट फर्नांडिस (40), नम्रता अल्फान्सो (33), अलिना जोसेफ (40), अमेर्या अल्फान्सो (7), अँथोनी फर्नांडिस (47) आणि आदियान अल्फान्सो (34) यांना उपचारानंतर बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले आहे. मात्र कविता मेनांजेस (52), रेझीनोर्ड डिसुझा (73) आणि अँथोनी मोहसीन (47) यांच्यावर थुंगा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर आग का व कशी काय लागली? याबाबत स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाच्या संबंधित अधिकारी यांच्याकडून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -