घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : भास्कर जाधवांची थेट मनसैनिकांना साद, पण राज ठाकरेंवर...

Lok Sabha 2024 : भास्कर जाधवांची थेट मनसैनिकांना साद, पण राज ठाकरेंवर टीका

Subscribe

ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर तोफ डागली. मात्र, दुसरीकडे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणजेच मनसैनिकांना साद घातली आहे.

अलिबाग : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अनंत गीते यांनी काल सोमवारी (ता. 15 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्यासोबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल तटकरे, काँग्रेसचे ॲड. प्रवीण ठाकूर उपस्थित होते. गीते यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्यावर तोफ डागली. मात्र, दुसरीकडे त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना म्हणजेच मनसैनिकांना साद घातली आहे. (Lok Sabha Election 2024 Bhaskar Jadhav criticism Raj Thackeray emotional appeal to MNS party workers)

गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्यातील लोकसभेचे गणित बदलले आहे, तर याचा फटका मविआला बसणार असल्याचे बोलले जात आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा जाहीर करताच त्यांच्यावर मविआच्या नेतेमंडळींकडून सडकून टीका करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव तरी कसे मागे राहतील. त्यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Lok Sabha 2024 : साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जाहीर, 12व्या यादीतून भाजपाची घोषणा

आमदार भास्कर जाधव प्रसार माध्यमांसमोर म्हणाले की, राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीची ही शोकांतिका सुरू आहे. त्याबद्दल अत्यंत वेदना होत आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राच्या पटलावरून जवळजवळ विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर असून, हे अत्यंत वाईट आहे, असे टीकास्त्र जाधवांनी डागले. तसेच, छोटे पक्ष या देशात ठेवायचे नाहीत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले आहे. त्याची सुरुवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यापासून झाली, असा टोला लगावत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला संपवण्याचाही भाजपाने प्रयत्न केला होता. परंतु ते कणखर व खंबीरपणे उभे राहिले, असे भास्कर जाधव यांच्याकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

मनसैनिकांना भावनिक साद…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. पण आता आमदार भास्कर जाधव यांनी थेट मनसैनिकांना साद घातली आहे. नेत्यांना काय निर्णय घ्यायचा तो घेऊ द्या. त्यांनी घेतलेला निर्णय मनापासून घेतला? त्यांना दिल्लीला जावे लागले की दिल्लीला बोलावून घेऊन त्यांना इशारा देण्यात आला याबद्दल चर्चा सुरू आहेत. मनसैनिकांनी त्या वादात न पडता खऱ्या शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन जाधव यांच्याकडून मनसैनिकांना करण्यात आले आहे. तर मनसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मूळ शिवसेनेच्या पाठीशी उभे राहून मदत करावी, अशी भावनिक सादही त्यांच्याकडून घालण्यात आली आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदान सात मे रोजी होत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांनी रायगड लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त निवृत्त पोलिस अधिकारी नितीन जगन्नाथ मयेकर आणि शेकाप नेते आस्वाद जयदास पाटील यांनीही अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा… Lok Sabha 2024 : अवघड ते सोपं करण्याची आमच्यात ताकद; असं का म्हणाले नारायण राणे?


Edited By : Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -