घरमहाराष्ट्रLok Sabha : नाराजांना राज्यसभा, विधान परिषदेचं आश्वासन; शब्द देण्यात भाजपा, शिंदे...

Lok Sabha : नाराजांना राज्यसभा, विधान परिषदेचं आश्वासन; शब्द देण्यात भाजपा, शिंदे सेना आघाडीवर

Subscribe

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने किंवा उमेदवारी जाहीर होऊनही शेवटच्या टप्प्यात तिकीट कापण्यात आल्याने नाराज झालेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभेचे आश्वासन देऊन तूर्त शांत करण्यावर प्रमुख राजकीय पक्षांनी भर दिला आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने किंवा उमेदवारी जाहीर होऊनही शेवटच्या टप्प्यात तिकीट कापण्यात आल्याने नाराज झालेल्या नेते, पदाधिकाऱ्यांना राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभेचे आश्वासन देऊन तूर्त शांत करण्यावर प्रमुख राजकीय पक्षांनी भर दिला आहे. पक्षाकडून मिळालेल्या या आश्वासनामुळे इच्छुकांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात स्वतःला झोकून दिल्याचे चित्र आहे. (Lok Sabha Election 2024 BJP, Shinde Sena are in the lead in giving the Rajya Sabha and Vidhan Parishad a word to the disgruntled )

राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महविकास आघाडी आणि भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती यांच्यात सरळ लढत होत आहे. तीन किंवा त्याहून अधिक पक्षांनी एकमेकांशी जुळवून घेतल्याने दोन्ही बाजूला जागावाटपात अडथळे आले. या अडथळ्यांवर मात केल्यानंतर उमेदवारीवरून आघाडी आणि महायुतीत अंतर्गत मतभेद उफाळून आले होते. मात्र, सर्व पक्षांनी विशेषतः भाजपा आणि शिंदे सेनेने हुशारीने राज्यसभा, विधान परिषद आणि विधानसभेचा शब्द देत उमेदवारीवरून हिरमोड झालेल्या नाराजांना लोकसभा निवडणुकीच्या कामाला जुंपले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Devendra Fadnavis : भाजपा घटनेला कोणाला हात लावू देणार नाही; देवेंद्र फडणवीसांचा इशारा

भाजपाने पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले या दोन राज्यसभा सदस्यांना लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपाचे हे उमेदवार निवडून आल्यास राज्यसभेच्या दोन जागा रिक्त होतील. या दोन जागांचे गाजर दाखवत भाजपाने काहींना शांत केले आहे. याशिवाय पुढील तीन महिन्यात विधान परिषदेच्या 21 जागा रिक्त होत आहेत. या रिक्त जागांवर वर्णी लावण्याचा शब्द राजकीय पक्षांनी नाराजांना दिला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे निवडून गेलेल्या 11 सदस्यांची मुदत 27 जुलै 2024 रोजी संपत आहे.  विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी जून महिन्यात निवडणूक अपेक्षित आहे. मुदत संपणाऱ्या सदस्यांमध्ये  शिवसेना शिंदे गटाच्या मनीषा कायंदे, उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपाचे विजय गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, काँग्रेसचे डॉ. वजाहत मिर्झा, प्रज्ञा सातव, राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर आणि शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेतील संख्याबळ फारसे बदलणार नाही. त्यामुळे या निवडणुकीवर महायुतीचे वर्चस्व राहणार असल्याने भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून नाराजांना आश्वासन पूर्ण करण्याची खात्री देण्यात आली आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय? मुलींच्या जन्मदराबाबत अजित पवारांचं वादग्रस्त विधान

भाजपाच्या हट्टामुळे शिंदे सेनेला कृपाल तुमाने (रामटेक), हेमंत पाटील (हिंगोली), भावना गवळी (यवतमाळ-वाशिम), गजानन कीर्तीकर (उत्तर पश्चिम मुंबई) या मावळत्या खासदारांना यंदा लोकसभेचे तिकीट देता आले नाही. त्यामुळे त्यांना विधान परिषद किंवा विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांचे राजकीय पुनर्वसन केले जाऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसे आश्वस्त केल्याने हे नाराज निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. भाजपाने ईशान्य मुंबईचे विद्यमान खासदार मनोज कोटक यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत ते मुलुंड मतदारसंघाचे उमेदवार असू शकतात.

लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने काहींनी सुरुवातीला पक्षात बंड केले. अशा बंडखोरांना शांत करत तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्यांना विधान परिषदेची बक्षिसी देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांनाही आमदारकीचे गाजर दाखविण्यात आले आहे. त्यासाठी राज्यपाल नामनियुक्त रिक्त असलेल्या 12 जागा पुढे केल्या जात आहेत.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : विशाल पाटील यांना संधी मिळायला हवी…, काय म्हणाले सत्यजीत तांबे?

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -