अपंगांच्या आगळ्या-वेगळ्या प्रेमविवाहाची सर्वदूर चर्चा

नाशिक : आपल्या सभोवताली दररोज अनेक प्रेमविवाह होत असतात मात्र, सिन्नर तालुक्यात नुकताच झालेला एक प्रेमविवाह मात्र सर्वदूर चर्चेचा ठरला. या प्रेमविवाहातील दोघेही अपंग असून, त्यांनी अत्यंत साधेपणाने विवाह करत समाजापुढे आदर्श ठेवला.

हा आगळा-वेगळा विवाह सोहळा उजनी गावात झाला. शिक्षणाच्या ओढीने सरपटत शाळेत जाणार्‍या दोघांची मैत्री झाली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि शेवट विवाहात झाला. जालिंदर आणि सारिका हे जन्मतःच अपंग आहेत. या दोघांनाही शिक्षणाची प्रचंड ओढ होती. काहीही झाले तरी आपण शिक्षण पूर्ण करायचे ही जिद्द त्यांनी ठेवली. दोन्ही घरची परिस्थिती हालाखीची असल्याने दररोज कुणी शाळेत सोडणे अशक्य किंवा वाहनव्यवस्था तर अवघड होती. मात्रष इच्छा असेल तिथे मार्ग दिसेल, या उक्तीप्रमाणे दोघांनी दररोज चप्पल हाताखाली घेत सरपटत सरपटत शाळेत जायला सुरुवात केला. त्यांच्या या जिद्दीमुळे दोघांचे शिक्षण पूर्ण झाले. अपंग शाळेत शिकताना ओळख-मैत्री-प्रेम आणि नंतर विवाह असा हा त्यांचा प्रवास झाला एखाद्या चित्रपटाच्या कथेला शोभेल असा आहे. दोघेही जमिनीवर सरकत प्रवास करतात. ३० जून २०२२ रोजी या दोघांनी कोर्ट रजिस्टर मॅरेज केले आणि थाटामाटात लग्न करण्याची इच्छा असूनही कौटुंबिक परिस्थिती नसल्याने अत्यंत साध्या पद्धतीने त्यांनी विवाह केला. या विवाह सोहळ्याप्रसंगी आशीर्वाद देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तु बोडके, जिल्हा चिटणीस समाधान बागल, नाशिक शहर प्रमुख श्याम गोसावी, सिन्नर तालुका प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे अरुण पाचोरकर यांच्यासह वधू-वराचे नातेवाईक व मित्रपरिवार उपस्थित होते.