घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमहानगर IMPACT : शहरातील 'आपलं सरकार' केंद्राची प्रशासनाकडून तपासणी; आज मोर्चा तालुक्यांकडे

महानगर IMPACT : शहरातील ‘आपलं सरकार’ केंद्राची प्रशासनाकडून तपासणी; आज मोर्चा तालुक्यांकडे

Subscribe

नाशिक : शैक्षणिक दाखल्यांसाठी आपलं सरकार केंद्राच्या माध्यमातून होत असलेल्या आर्थिक लुटमारीविरोधात ‘माय महानगर’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर या मालिकेतील तक्रारींची दखल घेत जिल्हा प्रशासन ‘अ‍ॅक्शन मोड’वर आले आहे. मंगळवारी जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशानुसार उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांच्या नेतृत्वात पथकाने शहरातील ‘आपलं सरकार’ केंद्राची तपासणी सुरू केली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात बुधवारपासून ‘आपलं सरकार’ केंद्राची तपासणी मोहिम राबविण्याचे आदेशही प्रशासनाने दिले आहेत.

महाविद्यालयीन प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळवण्यासाठी विद्यार्थी, पालकांची होत असलेली आर्थिक पिळवणूक प्रकरणी ‘माय महानगर’ने प्रकाशझोत टाकला असता विविध दाखल्यांसाठी पाचशे ते दोन हजार रूपये आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. इतकेच नव्हे तर अधिकार्‍यांचे आयडी, पासवर्डही केंद्र चालकांकडे असल्याचे समोर आले. दाखल्यांच्या प्रक्रियेतील डेक्स १ आणि डेक्स २ साठी पैसे द्यावे लागत असल्याच्याही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दाखल्यांसाठी जिल्ह्यातील सर्वच तहसिल कार्यालयांमध्ये नागरिक ताटकळ उभे असल्याचे चित्र या पाहणीतून समोर आले. परंतु प्रशासनाला याचे कोणतेही सोयरे सुतक नसल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे.

- Advertisement -

दाखल्यांअभावी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रिया रद्द होण्याची भितीही व्यक्त करण्यात येत आहे.दाखल्यांबाबत सुरू असलेला अनागोंदी कारभार पाहता प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली गेल्याचे दिसून आले. प्रशासनाचा यावर वचक नसल्याने याचाच फायदा घेत केंद्र चालकांना जणू रान मोकळे मिळाले. अखेर या सर्व तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी तातडीने जिल्ह्यातील सर्व आपलं सरकार केंद्र तपासणीचे आदेश दिले.

खरे म्हणजे, प्रत्येक तालुक्यात संबधित उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांना केंद्र तपासणीच्या सूचना दिल्या असतांनाही अधिकार्‍यांकडून आजपर्यंत एकाही केंद्राची तपासणी केल्याचे अथवा पाहणी केल्याचे ऐकीवात नाही. त्यामुळे मंगळवारी खुद्द प्रशासन उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत गंगापूर रोड, पेठरोडवरील केंद्राना अचानक भेटी दिल्या. तसेच स्वतंत्र पथक नियुक्त करत शहराच्या विविध भागात केंद्राना भेटी देत पाहणी केली. यावेळी काही नागरिकांशीही त्यांनी चर्चाही केली. आपलं सरकार केंद्राची दप्तर तपासणीही करण्यात आली. आता या पाहणीतून प्रशासनाने नेमकी काय कारवाई केली हे लवकरच समोर येईल. परंतु यामुळे आपलं सरकार केंद्रांच्या मनमानी कारभाराला चाप बसून विद्यार्थी, पालकांची लूट थांबेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

माय महानगरमधील वृत्ताची दखल घेत संबंधित अधिकार्‍यांना केंद्र तपासणीचे आदेश दिले आहेत. विद्यार्थी, पालकांची जर अशा प्रकारे आर्थिक पिळवणूक होत असेल तर निश्चितपणे कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. : गंगाथरन डी. जिल्हाधिकारी

- Advertisement -

माफक अपेक्षा 

आपलं सरकार केंद्राच्या माध्यमातून नागरिकांची होणारी लयलूट थांबावी व नागरिकांना दिलासा मिळावा याकरीता ‘माय महानगर’ने ठोस भूमिका घेतली. याची दखल घेत प्रशासनाने केंद्र तपासणीला सुरूवात केली ही बाब स्वागतार्ह आहे. मात्र केवळ तपासणीचा दिखावा करून चालणार नाही तर केंद्र तपासणीतून ज्यांनी पैसे कमवले त्यांच्यावर कारवाई व्हावी ही अपेक्षा.

माय महानगरने प्रसिध्द केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी आणि तहसिलदारांना केंद्र तपासणीचे आदेश दिले आहेत. मी स्वतः आज काही केंद्रांना भेट देऊन पाहणी केली आहे. नागरिकांनी दाखल्यांसाठी अतिरिक्त पैसे देऊ नये तसेच तर कोणी पैसे मागत असल्यास संबधित प्रांत किंवा तहसिलदारांकडे तक्रार करावी किंवा थेट माझ्याकडेही तक्रार नोंदवू शकता. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. नागरिकांची तक्रारींची दखल घेत केंद्रावरही कारवाई केली जाईल. : भीमराज दराडे, उपजिल्हाधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -