घरमहाराष्ट्रथंडीचा तडाखा; नागरिक खुश तर शेतकरी त्रस्त

थंडीचा तडाखा; नागरिक खुश तर शेतकरी त्रस्त

Subscribe

राज्यात गेल्या २४ तासांमध्ये एकंदरच तापमानाचा पारा घसरल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. अनेक ठिकाणी नागरिक शेकोट्या करून ऊब घेत आहे. 

गेल्या ८ ते १० दिवसांपासून मुंबईसह राज्यात थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नगर या प्रमुख शहरांसह संपूर्ण राज्यात कमी-जास्त प्रमाणात थंडीचा तडाखा जाणवतो आहे. गेल्या २-३ महिन्यांपासून उन्हामुळे त्रस्त असलेले नागरिक या थंडीमुळे सुखावले असल्याचं चित्र आहे. मात्र, नाशिककरांवर थंडीची जरा जास्तच कृपा असल्याचं दिसतंय. जिल्ह्यातील निफाडमध्ये आज ६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, शहरातला पाराही घसरुन ७.९ अंश सेल्सिअस अंशापर्यंत पोहोचला आहे. तर दुसरीकडे धुळे शहर आणि परिसरातही तापमानाचा पारा घसरला असून, आज येथे ६.८ डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगरमध्येही थंडीची चादर पसरली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये एकंदरच तापमानाचा पारा घसरल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. दुपारच्या सुमारास थंडीचा जोर कमी असला, तरी रात्री थंडी वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिक शेकोट्या करून ऊब घेत आहे.

शेतकरी मात्र त्रस्त…

यंदाच्या वर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीने जोर पकडला आहे. त्यामुळे उकाड्याने आणि घामाच्या धरांनी हैराण झालेल्या नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या थंडीमुळे राज्यातील शेतकरी काहीसा नाराज झाला आहे. गहू पिकांसाठी ही थंडी पोषक असली तरी द्राक्षांसाठी मात्र हे थंड वातावरण घातक ठरणारं आहे. तापमानाचा पारा खाली आल्याने द्राक्षांंमधीस मणी तडकणे, मण्यांची आणि पर्यायाने द्राक्षांची वाढ खुंटणे तसंच भुऱ्यासारख्या रोगांचा पीकांवर प्रादुर्भाव होणे या गोष्टींची शक्यता बळवते. त्यामुळे द्राक्षाने पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी थंडीचा काळ त्रासदायक ठरतो. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात थंडीचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. आता सामान्य नागरिकांसाठी जरी ही आनंदाची बाब असली तरी शेतकऱ्यांसाठी मात्र ही थंडी त्रासदायक ठरण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -