बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले आहे.

ajit pawar

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता अबाधित ठेवण्यासाठी प्राणांचं बलिदान केलेल्या शहीद वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भावपूर्ण अभिवादन केले आहे. राज्यातील जनतेला तसेच देशवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी व जडणघडणीत सैनिकांचे योगदान

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “आपला देश स्वतंत्र झाला, प्रजासत्ताक झाला, त्यावेळचा काळ देशासाठी खूपच कठीण काळ होता. देशासमोर अनेक आव्हानं होती. परंतु, गेली ७१ वर्षे हे प्रजासत्ताक आपण टिकवलं, वाढवलं, सुरक्षित केलं. जगातल्या इतर देशात लोकशाहीला धक्के बसत असताना आपली लोकशाही सुरक्षित राहीली, याचं श्रेय देशातील जनतेला आणि जनतेच्या लोकशाहीवरच्या विश्वासाला आहे. भारतीय लोकशाही व्यवस्थेवर, भारतीय राज्यघटनेवर अढळ विश्वास असलेल्या तमाम देशवासियांना मी वंदन करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या, त्यांच्या कुटुंबियांच्या, देशाच्या जडणघडणीत योगदान दिलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या योगदान, त्यागाबद्दलही”, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ वर्षांच्या वाटचालीत देश घडविण्यासाठी योगदान दिलेल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मपुरस्कारांनी सन्मानीत झालेल्या मान्यवरांचे, राष्ट्रपती पदकांनी सन्मानीत झालेल्या राज्याच्या पोलिस, अग्निशमन, तुरुंग सेवेतील पुरस्कार विजेत्यांचे, ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’विजेत्या राज्यातील बालकांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.


हेही वाचा – असा राज्यपाल महाराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही – शरद पवार