घरमहाराष्ट्रविदर्भात १५ ते २० जूनला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याचा अंदाज

विदर्भात १५ ते २० जूनला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याचा अंदाज

Subscribe

 

मुंबईः मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. अंदमानमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढील आठवड्यात तो केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. हवामानात काही अनपेक्षित बदल न झाल्यास मान्सून १५ ते २० जूनच्या दरम्यान विदर्भात धडकण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

- Advertisement -

१९ मे रोजी मान्सूनने अंदमान आणि निकोबार बेटात हजेरी लावली. तेथून त्याचा केरळच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. मान्सूनच्या प्रवासात अडथळा आला नाही तर ४ जून पर्यंत तो केरळमध्ये दाखल होईल. केरळमधून कोकणमार्गे मान्सून महाराष्ट्राच्या सीमेत दाखल होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

केरळमध्ये दाखल झाल्यानंतर तेथून विदर्भात पोहोचायला अंदाजे दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. या अंदाजानुसार ४ जूनला केरळमध्ये येणारा मान्सून १५ ते २० जूनच्या दरम्यान विदर्भात दाखल होईल. मान्सूनच्या प्रवासात तूर्त तरी कोणताच अडथळा दिसून येत नाही. त्यातूनही काही अडथळा आल्यास मान्सूनला विदर्भात पोहोचण्यास थोडा उशीर होईल. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा मान्सूनवर काहीच परिणाम होणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले आहे.

- Advertisement -

यंदा पाऊस चांगला होणार आहे असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभाग IMD व स्कायमेटने याधीच वर्तवला आहे. जूनपर्यंत गरम हवामान कायम राहणार आहे. उत्तर भारतात १८ मे नंतर गडगडाट व वादळ असेल. दरवर्षी १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. यंदा त्याला उशिर होणार आहे, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.

यंदा जून ते सप्टेंबर या महिन्यांत सरासरीच्या केवळ ९४ टक्केच पावसाचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. या अंदाजामुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीने त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या प्राथमिक अंदाजानुसार अल-निनोच्या प्रभावामुळे देशात जून ते सप्टेंबर या ४ महिन्यांत पावसाची सरासरी ८५८.६ मिमी राहण्याची शक्यता आहे. गुजरातसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट या मान्सूनच्या मुख्य महिन्यांत कमी पाऊस पडेल, तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तर भारतातील काही भागांत हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -