देशात आज निवडणुका झाल्या तर कुणाचं सरकार बनणार? जाणून घ्या जनतेचा कौल

संग्रहित छायाचित्र

देशात आगामी लोकसभा निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. ही निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. हे राजकीय पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एकीकडे सर्व पक्ष आगामी निवडणुकांचा तयारी करण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे इंडिया टूडे सी वोटरने एकत्र येत मूड ऑफ द नेशन सर्व्हे केला आहे. ज्यातून NDA सरकारच्या कामावर देशातील जनतेचं नेमक काय मत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी 2023 मध्येच हा सर्व्हे करण्यात आला असून ज्यात 1 लाख 40 हजार 817 लोकांनी सहभाग घेतला होता. यात देशातील अनेक ज्वलंत प्रश्नांवर लोकांची मत जाणून घेण्यात आली. जसे की, मोदी सरकारच्या कामगिरीवर किती टक्के जनता समाधानी आहे? आज जर निवडणुका झाल्या तर देशात कुणाचं सरकार येईल? NDA सरकारचं सर्वात मोठं यश आणि अपयश काय आहे? अशा अनेक प्रश्नांवर जनतेचा कौल कुणाच्या बाजूने आहे हे जाणून घेण्यात आलं.

या सर्व्हेनुसार, देशातील NDA सरकारच्या कामावर लोकांनी पसंती दिली आहे. 67 टक्के लोकांनी खूप चांगले, 11 टक्के लोकांनी फक्त चांगले आणि 18 टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी कोरोना महामारीतील मोदी सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे. 20 टक्के लोकांचे म्हणणं आहे की, मोदी सरकार कोरोनाच्या लढाईत यशस्वी झालं. तर कलम 370 हटवण्यात 14 टक्के, राम मंदिर बांधकाम 11 टक्के आणि जन कल्याण योजनेवर 8 टक्के लोकांनी यशस्वी कामगिरी म्हटली आहे. त्यावेळी NDA सरकारचं सर्वात मोठं अपयश या प्रश्नावर 25 टक्के लोकांनी महागाई असं सांगितल आहे. तर 17 टक्के लोकांनी बेरोजगारी, 8 लोकांनी कोरोनाशी संबंदित आणि 6 टक्के लोकांनी आर्थिक विकास असं कारण सांगितलं आहे.

भारत जोडो यात्रेबाबतही अनेक लोकांनी मत दिली आहेत. 29 टक्के लोकांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. तर 37 टक्के लोकांनी पक्ष मजबूत करण्यासाठी ठीक असल्याचं मत व्यक्त केलं आहे. तर 13 टक्के लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठीचं हे पाऊल असल्याचे म्हटल आहे. यासोबत 9 टक्के लोकांनी पक्षाला काही फरक पडत नसल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान आज निवडणुका झाल्या तर या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार या प्रश्नावरही जनतेने कौल दिला आहे. भाजपला 284 जागा, काँग्रेसला 68 आणि इतरांना 191 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दुसरीकडे मतांच्या टक्केवारीबद्दल सांगायचे झाल्यास,भाजपाला 39 टक्के, काँग्रेसला 22 टक्के आणि इतरांना 39 टक्के मत मिळण्याची शक्यता आहे.


ते माझ्या पक्षाचे नेते नाहीत; राऊतांचा आंबेडकरांवर पलटवार