घरक्राइमरक्षकच बनले भक्षक: Mumbai Police उपायुक्त - निरीक्षकांकडून आठ महिला पोलिसांवर बलात्कार,...

रक्षकच बनले भक्षक: Mumbai Police उपायुक्त – निरीक्षकांकडून आठ महिला पोलिसांवर बलात्कार, व्हिडीओ चित्रिकरण

Subscribe

 Mumbai Police मुंबई – मुंबईतील नागपाडा मोटर परिवहन विभागात चालक असलेल्या आठ महिला पोलीसांवर एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी वारंवार बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. मुंबई पोलीस दलाला काळिमा फासणाऱ्या या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करणारे एक पत्र दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महिला पोलिसांचा छळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी पीडित महिलांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे. या पत्राने मुंबईत महिला पोलिसच सुरक्षित नसतील तर सामान्य महिलांची काय कथा असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

काय आहे प्रकरण

मुंबईतील नागपाडा मोटर वाहन विभागात चालक असलेल्या आठ महिला पोलीसांच्या सहीचे एक पत्र शुक्रवारपासून समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. या पत्रावर आठही महिलांचे नाव आणि स्वाक्षरी आहे. आठ महिला पोलिसांनी आरोप केला आहे की, एक पोलीस उपायुक्त, दोन पोलीस निरीक्षक त्यांना सरकारी वाहनातून रुमवर नेऊन वारंवार बलात्कार करत होते. या तिघांसोबत एक रायटर, उपायुक्तांचा ऑपरेटर, चालक, ऑर्डली यांनीही महिलांवर अतिप्रसंग केल्याचा आरोप आहे.
या महिला पोलीसांना गर्भ राहिल्यानंतर त्यांना गर्भपात करण्यासाठी बळजबरी करण्यात आली. उपायुक्तांच्या आदेशावरुन त्यांना प्रत्येकी सात हजार रुपये देण्यात आले, आणि याची कुठेही वाच्यता करायची नाही, असा दम देण्यात आल्याचे पत्रात नमूद आहे.
पत्रात म्हटल्याप्रमाणे, दोन्ही निरीक्षक आठवड्यातून तीन दिवस आम्हाला जबरदस्ती घरी घेऊन जातात. आमचे अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करतात. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल केले जाते.

- Advertisement -

सर्व महिला पोलीस शेतकरी कुटुंबातील

पीडित महिला पोलीस या शेतकरी कुटुंबातील असल्याचे पत्रात म्हटले आहे. ‘आम्ही आठही जणी शेतकरी कुटुंबातील आहोत. पोलीस दलात नोकरी मिळाल्याने सुरक्षित वाटले, पण वरिष्ठांनी आम्हाला उद्ध्वस्त केले आहे. तुम्ही आम्हाला हवे ते दिले तर तुम्हाला डय़ुटीवर कोणतेच काम देणार नाही, असे आमिषही आम्हाला दाखवले’, असा त्यांचा आरोप आहे.या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांनी घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी पीडित महिलांनी केली आहे.

‘पोलीस आयुक्तांना 20 लाख रुपये लाच देऊन पोस्टिंग’

आम्ही या सर्वाविरोधात एकत्र येऊन संबंधित पोलीस उपायुक्तांकडे आवाज उठवला तेव्हा आमची बदली करण्यात आली. गृह विभाग आणि पोलीस आयुक्तांना 20 लाख रुपये लाच देऊन उपायुक्तांनी येथे पोस्टिंग मिळवली आहे. त्यांचे तुम्ही काहीच वाकडे करू शकत नाही, असे त्यांच्या ऑर्डलीने आम्हाला सांगितले. आम्हाला तिथून हुसकावून लावण्यात आले, असा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

- Advertisement -

राज्यात एका महिलेची पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली असताना महाराष्ट्रासारख्या राज्यात महिला पोलीसांवर अशा प्रकारचे अत्याचार समोर येत असल्यामुळे पोलीस दलासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : पोलिसाच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी BJP MLA सुनील कांबळेंच्या विरोधात गुन्हा दाखल; वाचा सविस्तर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -