नागपुरातील ‘या’ चार मंदिरात भारतीय संस्कृतीनुसार घालावे लागणार कपडे, ‘यांनी’ घेतला निर्णय

नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून येण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतल्याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांच्याकडून देण्यात आली आहे. श्री गोपालकृष्ण मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत घनवट यांनी ही माहिती दिली.

Nagpur these four temple Clothes to be worn according to Indian culture
नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून येण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतल्याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांच्याकडून देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात महिलांनी असभ्य कपडे घालून येऊन नये, असा फतवा काढण्यात आला होता. पण राज्यातील नागरिकांनी मंदिर समितीच्या या निर्णयाला प्रचंड विरोध केल्यानंतर मात्र हा निर्णय मागे घेण्यात आला. पण आता नागपूर येथील चार मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार कपडे घालून येण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतल्याची माहिती ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’चे समन्वयक सुनील घनवट यांच्याकडून देण्यात आली आहे. श्री गोपालकृष्ण मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील घनवट यांनी ही माहिती दिली. तर नागपूरनंतर महाराष्ट्रातील सर्वच मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी व्यापक अभियान राबवून भाविकांमध्ये वस्रसंहितेविषयी जागृती करण्यात येणार असल्याची माहिती घनवट यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – ३ वर्षाचा चिमुकलयाचा खेळता-खेळता तोल गेल्याने बेकरीच्या ग्रँडरमध्ये पडला, तितक्यात ग्रँडर चालू झाले; अन्…

नागपूर जिल्ह्यातील श्री गोपालकृष्ण मंदिर गोरक्षण सभा, (धंतोली), श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर (बेलोरी), श्री बृहस्पती मंदिर (कानोलीबारा), श्री दुर्गामाता मंदिर (हिल टॉप) या मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय सर्वांच्या संमतीने घेण्यात आला आहे. यावेळी श्री गोपालकृष्ण मंदिराचे विश्वस्त प्रसन्न पातुरकर, मंदिर कमिटी प्रमुख ममता चिंचवडकर व आशुतोष गोटे यांनी मंदिराचे पावित्र्यरक्षण आणि भारतीय संस्कृतीचे पालन व्हावे, या उद्देशाने मंदिरामध्ये भाविकांनी येताना अंगप्रदर्शन करणारे उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, तसेच भारतीय संस्कृतीचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे, अशा प्रकारचे आवाहन केले आहे. या संदर्भातील फलकही मंदिराच्या दर्शनी भागात लावण्यात आला आहे.

आज मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की, काही पुरोमागी, आधुनिकतावादी, व्यक्तीस्वातंत्र्यवाले गळा काढून छाती बडवायला लागतात; मात्र पांढरा पायघोळ झगा घालणाऱ्या ख्रिस्ती पाद्री, तोकडा पायजामा घालणारे मुल्ला-मौलवी वा काळा बुरखा घालणाऱ्या मुसलमान महिला यांच्या वस्त्रांबद्दल ते आक्षेप घेत नाहीत. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, महाराष्ट्रातील घृष्णेश्वर मंदिर, वाराणसीचे काशी-विश्वेश्वर मंदिर, आंध्रप्रदेशचे तिरुपती बालाजी मंदिर, केरळचे विख्यात पद्मानाभस्वामी मंदिर, कन्याकुमारीचे माता मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्त्विक वस्त्रसंहिता लागू आहे, असे म्हणत घनवट यांनी वस्त्रसंहितेला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला.

तसेच, गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीसस आणि सी कैथ्रेडल या मोठ्या चर्चमध्येही वस्त्रसंहिता लागू आहे. प्रत्येकाला ‘आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत’, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिकस्थळ आहे. तेथे धार्मिकतेला अनुसरूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे, असे मत सुनील घनवट यांनी व्यक्त केले. मंदिरातील सात्त्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची असेल, तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्त्विक असायला हवी, असेही घनवट यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.