डॉक्टर बबली पुन्हा अ‍ॅक्टिव्ह; लग्नाच्या आणाभाका घेत तरुणाची फसवणूक

सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आणि अनेक प्रतिष्ठितांना ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून लाखो रुपये उकळणार्‍या ‘डॉक्टर बबली’ अर्थात कथीत डॉ. नेहा जोशीचा फसवणुकीचा गोरखधंदा ‘आपलं महानगर’ ने दोन वर्षांपूर्वी उघडकीस आणला होता. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाने बबलीवर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एका प्रकरणात बबलीचा साथीदार संकेत सचिन चव्हाणला अटक झाली होती. कारवाईच्या ससेमिर्‍यापासून वाचण्यासाठी काही दिवस बबली गप्प बसली. पण आता पुन्हा एकदा तिने आपले ‘प्रेमाचे’ जाळे फेकण्यास सुरुवात केली आहे. त्यात काही काळ नाशिकमध्ये राहिलेला एक उच्चशिक्षित तरुण फसला असून लग्नाचे आमिष दाखवून त्याच्याकडून ऑनलाईन प्रणालीव्दारे चक्क ३३ हजार रुपये उकळण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे अजूनही बबलीचा मोबाईल नंबर कार्यरत आहे.
लग्नसोहळा डॉट कॉमवर डॉ. नेहा जोशी नावाने नोंदणी करून उपसचिव आरोग्य विभाग असे बनावट सरकारी ओळखपत्र दाखवत ‘बबली’ने अजिंक्य बारगजे यांना लग्नाचे आमिष दाखवले होते. त्यांच्याकडून ऑनलाईन ३८ हजार रुपये उकळण्यात आले होते. तसेच, बनावट जाहिरातीतून लोकांची फसवणूक व्हावी, यासाठी संशयित बबली डॉ. नेहा जोशी हिने तिच्या सोशल मीडियाच्या स्टेटसला जाहिरात ठेवली होती. संबंधित नावाने स्वाक्षरीचे पत्र व त्यावर आवक-जावकचे शिक्के मारून जिल्हा रुग्णालयास पाठवल्याचे भासवले होते. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करत संशयित संकेत सचिन चव्हाण याला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीही सुनावली. मात्र त्याच वेळी कोरोनाची लाट आल्याने हे प्रकरण फारसे टिकू शकले नाही. या प्रकरणावरुन बबली आता ‘सन्मार्गा’ला लागली असावी असा भोळा समज काहींनी करुन घेतला असेल. पण ‘बबली’ने आपल्या कृत्याव्दारे हा गैरसमज ठरवला आहे.

कसा फसत गेला उच्चशिक्षित तरुण?

‘आपलं महानगर’शी संपर्क साधत एका तरुणाने त्याच्या फसवणुकीची आपबिती कथन केली. त्याने सांगितले की, देशस्थ मॅट्रोमिनअल अ‍ॅप्लिकेशनवर ‘बबली’ उर्फ डॉ. नेहा जोशी हिने आपले बनावट परिचय पत्र टाकले आहे. त्यात तिने स्वत:चे शिक्षण एमबीबीएस असे टाकले आहे. नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात ती मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा बालरोग शल्यचिकित्सक असल्याचे परिचय पत्रात म्हटले आहे. मुलगी देशस्थ ब्राह्मण आहे, शिवाय तिचे शिक्षण, नोकरीही चांगली असल्याचा समज करीत एका तरुणाने तिला मोबाईलवर संपर्क साधला. व्हॉटस अ‍ॅपवर दोघांनी गप्पा केल्यात. या चॅटींगवरुन ती अतिशय सुस्वरुप असल्याचा समज या तरुणाने करुन घेतला. महत्वाचे म्हणजे हा तरुण स्वामी समर्थ यांचा भक्त असून बबलीच्या परिचय पत्रावरही ‘श्री स्वामी समर्थ’ असा उल्लेख आहे. दोघेही स्वामी भक्त असल्याचे लक्षात आल्यावर तो तिच्यावर भुरळून गेला.  तिला आई-वडिल नसल्याचे समजल्यावर हा तरुण तिच्याप्रती अधिक भावनिक झाला. मासा गळाला अडकल्याचे लक्षात येताच ‘बबली’ने आपले ‘हनी ट्रॅप’चे जाळे फेकायला सुरुवात केली. त्यात तिने लग्नासाठी पसंती दर्शवलीच. शिवाय काही दिवसात मुलाच्या घरी बघण्याचा कार्यक्रम करण्याचीही तयारी दर्शवली. कुंडलीतील ३६ पैकी ३५ गुण जुळत असल्याचा दाखलाही तिने दिल्याने आपली जीवनसाथी हीच आहे असे तरुणाने मनोमन ठरवले. त्यानंतर अचानक मेसेज आला की, ती कोवीड पॉझिटिव्ह आहे. परंतु बँकेचे अकाऊंट लॉक झाल्याने तातडीने पैसे उपलब्ध होत नाही. त्यामुळे इलाज बाजूला राहत आहे. सात हजार रुपयांची मदत झाल्यास दोन दिवसांनी ते पैसे परत दिले जातील असा शब्द तिने त्याला दिला. हे पैसे तिने नदीम शेख नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटला टाकायला सांगितले. त्यानंतर २५ सप्टेंबरला तिने आणखी १७ हजार रुपये मागितले. हे पैसे जगतपाल चौरे या नावाच्या व्यक्तीच्या अकाऊंटवर टाकण्यास सांगितले. हे पैसे दिल्यानंतर बबलीच्या कथीत भावाने महेंद्र जोशी नावाने फोन केला आणि आभार मानले. या तरुणामुळे बहिणीला जीवनदान मिळाल्याचे सांगत त्याने कृतज्ञता व्यक्त केली. हे इथपर्यंतच थांबले नाही तर आता हे दोघे भाऊ-बहीण वर परीक्षणाच्या कार्यक्रमास येत आहेत असेही सांगण्यात आले. त्यामुळे प्रेमाच्या जाळ्यात अडकलेला तरुणाच्या अपेक्षा अधिकच वाढल्या. पण पुन्हा एकदा बबलीने नवा फासा टाकला. यावेळी तिने आपल्याकडे चांगल्या दर्जाचे ड्रेस नसल्याचे सांगत पुन्हा साडेनऊ हजाराची मागणी केली. हे पैसे दिले नाही तर ती नाराज होईल आणि लग्नाला नकार देऊ शकते असा विचार करीत तरुणाने हे पैसेही ऑनलाईन ट्रान्सफर केले.

Dr. Neha Joshi
कथीत डॉ. नेहा जोशी हिच्या व्हॉटस्अ‍ॅप प्रोफाईलवर सध्या हाच फोटो आहे. मात्र, तो तिचाच फोटो आहे याची शाश्वती कोणी घेत नाही. त्यामुळे ती दुसर्‍याचा फोटो स्वत:च्या नावाने वापरत असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

कथित नेहा जोशीचे असे आहेत उद्योग..

  • सार्वजनिक आरोग्य विभागात स्टाफ नर्स भरतीचे पत्र तयार केलेभरतीच्या बनावट शासन आदेशावर जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून स्वाक्षरी
  • नोकरीचे आमिष दाखवून अनेकांकडून पैसे उकळणे
  • अनाथ असल्याचे भासवून इमोशलन ब्लॅकमेलिंग
  • नावाचा आणि पदाचा उल्लेख करून वर्तमानपत्रांच्या नावाने बनावट बातम्या व्हायरल करणे
  • राष्ट्रपतीपदक मिळाल्याचा दावा करणारे बनावट पत्र परिचितांना पाठवणे
  • उत्कृष्ट आरोग्य उपसंचालकाचा पुरस्कार मिळाल्याचे बनावट प्रमाणपत्र व्हायरल करणे
  • अन्न व औषध प्रशासन विभागाला विशिष्ट औषधबंदीचे पत्र पाठवत चौकशी अहवाल सादर करण्याचे पत्र
  •   राज्य निवडणूक आयोगाचे बनावट प्रशस्तीपत्रक तयार करणे
  •  के. पी. बक्षींच्या नावाने बनावट पत्र तयार करुन निवडणूक काळात कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवण्याचा आश्चर्यजनक प्रकार
  • अतिरिक्त संचालिका असल्याचे दर्शवित जिल्हा रुग्णालयांशी पत्रव्यवहार

गुगलवर शोधले ‘आपलं महानगर’

सुमारे३४ हजार रुपये अकाऊंटवर पडल्यावर मात्र बबलीच्या बोलण्यात तरुणाला फरक जाणवला. ती काहीशी तुटक बोलू लागली. त्यामुळे संशय वाढल्याने त्याने गुगल सर्चवर डॉ. नेहा जोशीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला दोन वर्षापूर्वी ‘आपलं महानगर’ने केलेली ‘डॉक्टर बबली’ मालिका वाचायला मिळाली. त्यावरुन त्याने प्रस्तुत प्रतिनिधीशी संपर्क साधत आपबिती सांगितली.