घरक्राइम९९ लाखांची फसवणूक; नरेश कारडावर आठवा गुन्हा

९९ लाखांची फसवणूक; नरेश कारडावर आठवा गुन्हा

Subscribe

गाळे बुकिंगच्या मोबदल्यात ५८ लाख घेत गुंतवणुकीवर १२ टक्के परताव्याचे आमिष

नाशिकरोड येथील गुरुद्वारासमोरील ‘डेस्टिनेशन वन’ नावाच्या प्रकल्पामध्ये दोन गाळे बुकिंग करून बांधकाम व्यावसायिक नरेश कारडांसह संचालकांनी तक्रारदार मनोज हरियानींकडून ५८ लाख रुपये घेतले. तसेच, जादा परतावा देण्याच्या हमीवर गुंतवणूक केल्यास १२ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची कारडाने तक्रारदार फसवणूक केल्याचा प्रकार सोमवारी (दि.१५) उघडकीस आला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयित नरेश कारडा, मृत मनोहर कारडा, अशोक मोतीलाल कटारिया यांच्यासह श्री साईनाथ लॅन्ड न्ड डेव्हलपमेंट (इंडिया) प्रा.लि कंपनीच्या अन्य संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
कारडा फसवणूक प्रकरणात आता प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अशोका बिल्डकॉन समूहाचे संशयित अशोक कटारिया यांचेही नाव पुढे आले आहे. त्यांच्यासह सतीष धोंडूलाल पारख, अनुप सुभाषचंद्र कटारिया व अन्य संचालकांविरुद्ध उपनगर पोलिसात फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण अधिनियमांच्या (एमपीआयडी)कलम ३ व ४अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मनोज लेखराज हरियानी (वय ४७, रा. प्रियंका ग्लोसम, सिरिन मेडोज, गंगापूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनोज हरियानींच्या फिर्यादीनुसार, १० जानेवारी २०१९ ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत फिर्यादी मनोज हरियानी यांनी ‘डेस्टिनेशन वन’मध्ये बुकिंग केलेल्या गाळा क्रमांक एफजी ३ व ४ बुक केले होते. त्या बदल्यात कंपनीच्या सर्व संचालकांना ५८ लाख रुपये दिले होते. त्याव्यतिरिक्त जादा परतावा देण्याची हमी संबंधितांनी त्यांना दिली व गुंतवणूक केल्यास १२ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून ४१ लाख ८९ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांना दरमहा ३७ हजार ३०० रुपयेप्रमाणे काही महिने ६ लाख ८४ हजार ९०० रुपये इतका परतावा दिला. यानंतर मात्र परताव्याची रक्कम देणे बंद केले. तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत केली नाही. दोन्ही गाळे खरेदीकरिता भरलेल्या रकमेसह सुमारे ९९ लाख ८९ हजार ४५० रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्याविरुद्ध यापूर्वीही सात फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यांना यापूर्वी अटकदेखील झाली होती. नऊ दिवसांची पोलीस कोठडी भोगल्यानंतर न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. दरम्यान, यामध्ये मागील आठवड्यात पुन्हा भर पडली असून त्यांच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे शुक्रवारी (दि.१२) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आता एकूण सात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे कारडा यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत.

१६ कोटींहून अधिक फसवणूक

- Advertisement -

नरेश कारडाविरुद्ध आतापर्यंत आठ गुन्हे दाखल झाले असून, फसवणुकीची रक्कम १६ कोटींपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे. मुंबईनाका, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प या चार पोलीस ठाण्यांमध्ये कारडाविरुद्ध गुन्हे नोंद आहेत. आर्थिक गुन्हे शाखेकडेसुद्धा ३० पेक्षा जास्त तक्रार अर्ज यापूर्वीच आले असून या अर्जांची चौकशी केली जात आहे. यामुळे कारडा यांच्याविरुद्ध गुन्हे अजून दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -