घरताज्या घडामोडीआचार्‍याच्या 'प्रसादा'ने नांदूर, दोडी हादरले

आचार्‍याच्या ‘प्रसादा’ने नांदूर, दोडी हादरले

Subscribe

नाशिक : सिन्नर तालुक्यातील कणकोरी येथील आचारी मुंबईत पंधरा दिवस राहिला. तेथे गरजूंना अन्नपुरवठा करणार्‍या केंद्रांवर अन्न शिजवण्याचे काम केले. नंतर गावी आला. आचार्‍याचा व्यवसाय तसेच राजकीय कार्यकर्ता असल्याने नांदूर शिंगोटे आणि दोडी बुद्रूक येथील नागरिकांशी चांगले संबंध असल्याने अनेक दिवसांनी आल्याने त्याने दोन्ही गावांमध्ये जाऊन मित्र, आप्तांच्या भेटी घेतल्या. त्यातच नांदूर शिंगोटे येथील दशक्रिया विधीला हजेरी लावली. या सगळ्या धावपळीत ताप आला. त्यानंतर त्याची कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह आला. यामुळे आठ दिवसांमध्ये त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व मित्र, आप्त व राजकीय कार्यकर्त्यांची पाचावर धारण बसली आहे.
पंचक्रोशीमध्ये प्रसिद्ध असलेल्या आचार्‍याला या लॉकडाउनच्या काळात मुंबईत अन्न शिजवण्याचे काम मिळाले. त्यानिमित्त मुंबईत १५ दिवस राहिल्यानंतर राहिल्यानंतर आचारी गावाला आला. त्यातच नांदूर शिंगोटेत एक दशक्रिया विधी असल्याने तेथे हजेरी लावून अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. एक दिवस कामानिमित्त दोडी येथेही हजेरी लावली. तेथील सर्वच राजकीय कार्यकर्त्यांशी भेटीगाठी घेतल्या. दरम्यान एक दिवस नांदूर शिंंगोटेत एका संस्थेने सॅनिटायझर वाटप करण्याचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला परिसरातील माजी आमदारांसह इतर राजकीय कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. या वेळी या आचार्‍यानेही हजेरी लावली. राजकीय कार्यकर्त्यांसोबत सॅनिटायझर वाटपाचे फोटो काढले. नंतर दोन दिवसांनीच त्याला ताप आला. त्यामुळे तपासणीसाठी संगमनेरला गेला. तेथून औषधे घेऊन आल्यानंतरही ताप थांबला नाही म्हणून स्थानिक खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेला. तेथे त्याच्या प्रवासाचा इतिहास बघून डॉक्टरांनी सिन्नरला पाठवले आणि तेथे कोव्हिड १९ची चाचणी करण्यात आली. ही चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संगळीकडे धावपळ उडाली. आरोग्य व पोलीस यंत्रणेने तातडीने त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाइन केले. अधिक संपर्कात आलेल्यांच्या कोव्हिड चाचण्या केल्या. त्यातील काही जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर काहींच्या येणे बाकी आहे. जगभर थैमान घातलेल्या या महामारीचा आपल्या गावात वा गावाजवळ प्रवेश झाला आहे आणि संबंधिताशी आपला मागील आठवड्यात संपर्क आला आहे, या कल्पनेने सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते घाबरून गेले आहेत. यंत्रणेने नांदूर शिंगोटे गावातील या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना होम क्वारंटाइन केले आहे. लोकांनी घाबरू नये, पण काळजी घेण्याचे आवाहन करून पुढील आठ दिवस कुणीही घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. आठ दिवसांमध्ये या आचार्‍याबरोबर मुंबईला आणखी दोघे जण होते. आरोग्य विभागाने त्यांचेही स्वॅप तपासणीसाठी घेतले असून गेल्या आठ दिवसांमध्ये या सर्वांच्या संपर्कात किमान आठशे लोक आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. यामुळे दोडी, नांदूर शिंंगोटे व कणकोरी या गावांमध्ये प्रचंड भीतीचे व दहशतीचे वातावरण असून लोकांना घरात थांबण्याचे आवाहन केले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -