घरमहाराष्ट्रनाशिकभुजबळ दिसले महानगरपालिकेच्याही पालकाच्या भूमिकेत

भुजबळ दिसले महानगरपालिकेच्याही पालकाच्या भूमिकेत

Subscribe

लोकप्रतिनिधींची नवी कार्यकारिणी येईपर्यंत सदसदविवेक बुद्धीने काम करा; प्रशासनाला दिला डोस

नाशिक : लोकप्रतिनिधींची नवी कार्यकारिणी येईपर्यंत सदसदविवेक बुद्धीने काम करा, असा डोस पालकमंत्री छगन भुजबळ यांनी महापालिका प्रशासनाला सोमवारी (दि. २५) विशेष बैठकीदरम्यान दिला. महापालिकेचे दायित्व दुपटीवर गेल्यामुळे आवश्यकता असलेलीच कामे करावी,शहरातील उड्डाणपुल व इतर विकास कामे आवश्यकतेनुसार करावी, जेणेकरुन नाशिकची स्काय लाईन खराब होता कामा नये. तसेच महापालिकेतील मंजूर असलेली अत्यावश्यक पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी अशा सूचना त्यांनी केल्यात.

राजीव गांधी भवन येथे आयोजित आढावा बैठकीत भुजबळ बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार, अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,करुणा डहाळे, उपायुक्त (प्रशासन) मनोज घोडे-पाटील, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, गोदावरी संवर्धनचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त (कर) अर्चना तांबे, डॉ. दिलीप मेनकर, मुख्य लेखापरीक्षक किरण सोनकांबळी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisement -

छगन भुजबळ म्हणाले की, महानगरपालिकेच्या अत्यावश्यक ६९५ पदांना मंजूरी आली आहे. सदरची पदे वैद्यकीय, पाणीपुरवठा व अग्नीशमन विभागाची असून मंजूरी मिळालेल्या पदांची लवकरात लवकर भरती प्रक्रीया राबविण्यात यावी.महानगरपालिकेकडून दिव्यांगासाठी इटीसी सेंटर सुरु केले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षण, प्रशिक्षणं व सेवा आणि इतर आवश्यक सेवा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच शहरातील रस्त्यांची कामे दर्जात्मक करावी.रस्त्यांच्या कामाच्या दर्जाबाबत तक्रार आल्यास गुणवत्ता विभागाकडून तपासणी करावी, निकृष्ट कामे करणाऱ्यांची गय करू नये. महापालिकेच्या मोकळ्या जागांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना यावेळी भुजबळ यांनी दिल्यात.

आरोपांना पुष्टी
भारतीय जनता पक्षाची सत्ता असणाऱ्या नाशिक महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर सोमवारी पालकमंत्री छगन ‘महापालिकेतील झालेला भ्रष्टाचार मी नाकारत नाही’, असे स्पष्ट करत राऊतांच्या आरोपांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुष्टी दिली.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -