बर्थडे सेलिब्रेशनवर पडले महागात; भरधाव कारच्या अपघातात तरुणी ठार

नाशिक : बर्थ डे साजरा करण्यासाठी शहराबाहेर गेलेल्या सात मित्रमैत्रिणींच्या मारुती इर्टिका कारला (एमएच १५, ईएक्स-०९४९) झालेल्या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. कोमल ओम प्रकाश सिंग (वय १८, रा. पाईपलाईन रोड, गणेशनगर, नाशिक) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
गंगापूररोडवरील हॉटेल गंमत-जंमतनजीक हा अपघात झाला. त्यात ही कार विरुद्ध दिशेला असलेल्या भिंतीवर जाऊन आदळली होती. बुधवारी (दि.३) सायंकाळी झालेल्या या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेमंत कमलाकर गायकवर (वय २०), वैष्णवी मंडळकर (वय ३०), तन्वीर निसार मन्सुरी (वय २२, रा. पखाल रोड, नाशिक), विकास हातांगळे (२०), नेहा आसरलाल सोनी (१८), अतिश किशोर छेडे (२०) अशी जखमींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाढदिवसाचे सेलिब्रेशन करायला शहराबाहेर गेलेल्या तरुण-तरुणींना उत्साहाचे रुपांतर आक्रोश आणि वेदनांमध्ये होईल, याची जराही कल्पना नव्हती. याची पुसटशी कल्पना नव्हती. वाढदिवस साजरा केल्यानंतर नाशिककडे येत असताना वळण रस्त्यावर अंदाज न आल्याने भरधाव कारवर चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही. भरधाव कार रस्त्यालगतच्या भिंतीवर जोरात आदळली. या भीषण अपघातात सात जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना सिव्हीलमध्ये पाठवण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करत कोमल सिंग हिला मृत घोषित केले. इतर सहा जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.