माजी शिक्षण उपसंचालक पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज

शिक्षक मान्यता प्रकरण : भद्रकाली पोलीस नोंदवणार जबाब

fraud educational officer arrested in ulhasnagar
प्रातिनिधीक फोटो

नाशिक : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली वीर यांचे प्रताब अद्याप मिटलेले नसताना आता निरंतर शिक्षणाधिकरी तथा माजी शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांनी दिलेल्या शिक्षकांच्या मान्यता अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज प्राप्त झाला असून, पोलीस लवकरच पाटील यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी विभागातील कर्मचार्‍यांचा जबाब नोंदवणार आहेत.
माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांचा कारभार अनेकदा वादातीत राहिला आहे. 18 मे 2020 रोजी शासनाने माध्यमिक शिक्षणाधिकारी व प्रभारी शिक्षण उपसंचालक या दोन्ही पदांचा कार्यभार सोपवला. त्यामुळे या पदावर बसवण्यास अनेकांनी विरोध केला. मात्र, हा विरोध डावलून त्यांच्याकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी या महत्वाच्या पदासह शिक्षण उपसंचालक या पदाचा अतिरीक्त कार्यभार सोपवण्यात आला. त्यांनी दिलेल्या मान्यता व शालार्थ आयडी यांची चौकशी करण्याची मागणी प्रवीण महाजन व नीलेश साळुंखे यांनी केली होती. त्यांचे शिक्षणाधिकारीपद रद्द करण्याची मागणीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे झाली. तसेच डॉ.वैशाली झनकर यांना निलंबित केलेल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर बसण्याची त्यांची इच्छा होती. परंतु, त्यादृष्टीने निर्णय होऊ नये, यासाठी शिक्षण विभागातील काही कर्मचारी कार्यरत असल्याचेही पुढे आले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात महाजन यांनी अर्ज दिला असून, त्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस लवकरच प्रवीण पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील संबंधित कर्मचार्‍यांचा जबाब नोंदवणार आहेत.

माजी शिक्षण उपसंचालक प्रवीण पाटील यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झालेली आहे. मात्र, अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही. या प्रकरणी पाटील यांच्यासह शिक्षण विभागातील संबंधित कर्मचार्‍यांचा जबाब नोंदवून घेणार आहोत. अर्जावरुन एखाद्या अधिकार्‍याची चौकशी केली म्हणजे तो दोषी असतोच असे नाही.
शिवाजी अहिरे, सहायक पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे