घरताज्या घडामोडीकरोना इफेक्ट : १५ वर्षात प्रथमच ‘गोदावरी गौरव’ स्थगित

करोना इफेक्ट : १५ वर्षात प्रथमच ‘गोदावरी गौरव’ स्थगित

Subscribe

जगभर करोना आजाराने धुमाकूळ घातला आहे. भारतात दिवसेंदिवस करोनासदृश्य रुग्णांची संख्या वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १० मार्च रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा गोदावरी गौरव पुरस्कार कार्यक्रम १५ वर्षात प्रथमच स्थगित करण्यात आला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह मकरंद हिंगणे व आमदार हेमंत टकले यांनी दिली.

हिंगणे म्हणाले, करोनाचा प्रादूर्भाव वाढू नये, यासाठी गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. ज्या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांची गर्दी होते. अशा ठिकाणी शिंकणे, खोकणे या माध्यमातून करोना विषाणू पसरतो, असे आढळून आले आहे. सरकारच्या आवाहनास प्रतिसाद देत व मुलांसह ज्येष्ठ नागरिकांना कोणत्याही प्रकारची बाधा होऊ नये, यासाठी गोदावरी गौरव पुरस्कार कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी विश्वस्तांशी चर्चा करुन घेतला आहे. कुसुमाग्रज स्मारकात कार्यक्रमानिमित्ताने प्रेक्षक व आयोजक येतात. त्यांनी हात धुवूनच सभागृहात जावे. यासाठी दोन वॉश बेसिन, जंतूनाशक साबणासह पाण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच स्मारकात तीनवेळा साफसफाई केली जात आहे. करोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर गोदावरी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रमाची तारीख जाहीर केली जाणार आहे.

- Advertisement -

१९९२ पासून गोदावरी पुरस्कारास सुरुवात

कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १९९२ पासून गोदावरी गौरव पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. विविध सहा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या व्यक्तींना सन्मान कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने केला जातो. प्रतिष्ठानच्या वतीने एक वर्षाआड ‘गोदावरी गौरव’ पुरस्कार देण्यात येतो. यंदा पुरस्काराचे १५ वे वर्षे आहे. २१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे गोदावरी गौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. नृत्य-पद्मश्री दर्शना जव्हेरी (मणिपुरी नृत्य), शिल्प-भगवान रामपुरे, सोलापूर, क्रीडा-काका पवार, (कुस्ती प्रशिक्षक), लोकसेवा-श्रीगौरी सावंत (ट्रान्सजेंडर व्यक्तींना ओळख मिळवून देण्यात योगदान), चित्रपट-सई परांजपे, विज्ञान-डॉ. माधव गाडगीळ (जैवशास्त्रीय संरक्षित वन कल्पनेचे जनक) यांना पुररस्कार प्रदान केला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -