घरमहाराष्ट्रनाशिकसुंभ जळाला तरी...

सुंभ जळाला तरी…

Subscribe

पक्षातील गळतीची गंभीर दखल घेण्याऐवजी पक्षनेतृत्व सत्ताधाऱ्यांना दूषणे देण्यात धन्यता मानत असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकता आतून पराभव मान्य तर करीत नाही ना अशी शंका घेण्यास त्यांची तोंडची भाषा व देहबोली पूरक आहे. नाशिक दौऱ्यावर आलेल्या सुप्रिया सुळे यांनीही तसाच ‘सिग्नल’ दिला. ‘कोणी आले अन्‌ गेल्याने पक्षाचे अस्तित्व टिकत नाही’, हे त्यांचे माध्यम संवादाप्रसंगीचे वक्तव्य त्यासाठी दखलपात्र ठरावे. त्यांच्या या वक्तव्याचा थेट भुजबळ यांच्या कथित सेनाप्रवेशाशी संबंध नाही काय, असा प्रश्न थेट स्वकीयांच्याच मनात डोकावू लागला आहे. याचा अर्थ भुजबळ राहिले काय अन्‌ गेले काय, पक्षाला फार फरक पडणार नाही, हा सुळे यांचा गर्भित इशारा समजायचा काय? व्यावहारिक भाषेत पक्षनेतृत्वाची सद्यस्थिती ‘सुंभ जळाला तरी.....’ या प्रमेयाशी मिळतीजुळती आहे.....

इंग्रजीतील एका सुभाषिताच्या अनुवादानुसार भयगंड हे अति आक्रमकतेचे दुसरे नाव आहे. स्वकीयांच्या पक्षांतर धोरणामुळे विव्हळलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची स्थिती या प्रमेयाला अनुसरून असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये. वस्तुत;, सद्यस्थितीत पवार कुटुंबीय आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील वगळता पक्षाच्या प्रत्येक नेत्याची निष्ठा तपासण्याला पुरेपूर वाव आहे. पक्षाच्या पडझडीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे नुकत्याच नाशिक दौऱ्यावर होत्या. स्वाभाविकच सध्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू असलेल्या बाहुबली नेते छगन भुजबळ यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून होते. सुळे यांच्या दौऱ्यादरम्यान भुजबळ यांनी हजेरी लावली नसली तरी माजी खासदार समीर भुजबळ त्यांच्यासोबत होते. तथापि, सुळे यांच्यासोबत व्यासपीठावर बसलेले किती जण मनाने पक्षासोबत आहेत, हा संशोधनाचा भाग ठरावा.

सुळे यांनी तीन कार्यक्रमांना हजेरी लावली असली तरी त्यांच्या ‘कोणी आले अन्‌ गेल्याने पक्षाचे अस्तित्व टिकत नाही’, हे माध्यम संवादाप्रसंगीचे वक्तव्य दखलपात्र ठरावे. त्यांच्या या वक्तव्याचा थेट भुजबळ यांच्या कथित सेनाप्रवेशाशी संबंध नाही काय, असा प्रश्न थेट स्वकीयांच्याच मनात डोकावू लागला आहे. याचा अर्थ भुजबळ राहिले काय अन्‌ गेले काय, पक्षाला फार फरक पडणार नाही, हा सुळे यांचा गर्भित इशारा समजायचा काय?

- Advertisement -

सुप्रिया सुळे यांच्या दिवसभरातील दौऱ्यात पक्षाची पडझड आणि सत्ताधाऱ्यांची दमणनिती यावर भरपूर चर्चा झाली असली तरी ‘डॅमेज कंट्रोल’बाबत त्यांनी अवाक्षरही काढले नाही. राज्यात पक्षाला जे दयनीय स्वरूप आलेय, त्यापेक्षा वेगळी परिस्थिती नाशिक जिल्ह्यात नाही. पक्षाचे जिल्हाभरात चार आमदार असले तरी हा कौल पाच वर्षांपूर्वीचा आहे. कालौघात पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. खुद्द पक्षाचे बिनीचे नेते असलेल्या छगन भुजबळ यांना ‘होमग्राऊंड’ असलेल्या येवल्यात अंतर्गत विरोध होत आहे. त्यांचे पुत्र पंकज यांची दोन सत्रापासून प्रतिनिधीत्व करीत असलेल्या नांदगावमधील नौका हेलकावे खात आहे. दिंडोरीत पक्षापेक्षा स्वकर्तृत्वावर तग धरून राहिलेल्या नरहरी झिरवाळ यांना यावेळीही तसा फारसा धोका नाही, तर बागलाणमधील आमदार दिपीका चव्हाण यांचे ‘तळ्यात मळ्यात’ सुरू आहे.

बरं, भुजबळ सोडले तर पक्षाकडे जनाधार असलेला एकही खमक्या नेता नाही. ही स्थिती लक्षात घेता पक्ष सध्या रूग्णशय्येवर आहे, मात्र, नेतृत्व त्याकडे कितपत गांभीर्याने पाहते, हा यक्षप्रश्न आहे. सुळे यांच्या उपस्थितीतील मेळाव्यात व्यक्त झालेल्या तालुकास्तरावरील नेत्यांच्या भावना अनेकार्थाने बोलक्या राहिल्या. समीर भुजबळ यांच्यासमक्ष छगन भुजबळ व पंकज यांच्या उमेदवारीला झालेला जाहीर विरोध, तालुकाध्यक्षांची खदखद, लोकसभेप्रसंगी झालेली बंडाळी, पक्षातील मनमानी कारभार, जिल्ह्यातील पक्षाची बिकटावस्था, कार्यकर्त्यांमधील संभ्रम अशा अनेक मुद्द्यांद्वारे खरेतर सुळे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना परिस्थिती अवगत व्हायला हवी. वास्तविक पाहता पक्ष संक्रमणावस्थेतून जात असताना भुजबळ आणि इतर नेत्यांच्या पक्ष सोडण्याबाबतच्या संदिग्धतेवर फुंकर घालणे अपेक्षित असताना त्यांनी कोणी आले अन्‌ गेल्याने पक्षाचे अस्तित्व टिकत नसते, असे सडेतोड वक्तव्य करून साऱ्यांनाच आचंबित करून टाकले.

- Advertisement -

राजकीय अभ्युदय अनुभवलेल्या एखाद्या पक्षाची अवनती सुरू झाली तरी नेतृत्व ती मान्य करायला तयार नसते. याला कोणताही पक्ष अपवाद नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एवढा गाळात चाललेला असताना होणारे नुकसान रोखायचे कसे, यावर जर सुळे यांच्यासारख्या राज्यस्तरावरील नेत्या बोलणार नसतील तर ती अपेक्षा कोणाकडून ठेवायची. उद्याच्या विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. लोकसभा निवडणूकीत नाशिक व दिंडोरी मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणूकीत जिल्ह्यातील पंधरापैकी केवळ दिंडोरी विधानसभा क्षेत्रात थोडेबहुत मताधिक्य मिळवण्यात पक्षाला यश लाभले.

इतरत्र युतीच्या उमेदवाराला मिळालेली मते पाहता विधानसभेत राष्ट्रवादीसाठी फार दिलासादायक स्थिती राहण्याची शक्यताही व्यक्त करणे म्हणजे वस्तुस्थितीवर पांघरूण घालण्यासारखे आहे. यदाकदाचित, उद्या भुजबळांनी शिवबंधन बांधले तरी पक्ष अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होणार आहे. सत्ताकाळात तरी किमान भुजबळ यांनी अनेकांना पदे अथवा येनकेन प्रकारे लाभार्थी बनवून उपकृत करून ठेवल्याने गेल्या पाच वर्षांत भुजबळ यांच्या शब्दाला किंमत देणे या मंडळींसाठी क्रमप्राप्त ठरले. श्रीराम शेटे, दिलीप बनकर, अंबादास बनकर ही काही नावे आपापल्या परगण्यांमध्ये पक्ष अस्तित्व टिकून ठेवण्यात यशस्वी ठरली असली तरी त्यांनाही मर्यादा आहेत. याचा अर्थ जिल्ह्याची पक्षनेतृत्वापुरती मदार केवळ भुजबळ हेच सांभाळू शकतात, ही काळ्या दगडावरील धवल रेषा ठरावी. तरीदेखील पक्ष त्यांच्याबाबत इतकी अनास्था दाखवण्याचे कारण काय? भुजबळ यांच्यावरील मनी लाँड्रींग, भ्रष्टाचार, जातीयवाद यांबाबतचे आरोप समजण्याजोगे आहेत. त्यांची जेलवारीही देशभर चर्चेचा भाग ठरला होता. तथापि, नाशिक जिल्ह्यात पक्षाची पाळेमुळे रोवण्याचे श्रेय केवळ त्यांनाच जाते. असे असताना भुजबळ पक्षांतराचा निर्णय घेणार नाहीत किंवा त्यांनी तसा निर्णय घेऊ नये, एवढे म्हणण्याची तसदीही सुळे यांनी घेतली नाही. या सर्व बाबींचा जिल्ह्याच्या राजकारणावर दीर्घकालीन परिणाम होतील, हे नक्की.

सारांशात, केवळ राजकीय घराणेशाही, भाईभतिजेगिरी आणि विशिष्ट कोंडाळ्याच्या हातातील निर्णयप्रक्रिया ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या घसरत्या आलेखाची मूळ कारणे ठरावीत. शरद पवार यांच्यासारख्या मुरब्बी नेत्याच्या हाती सुत्रे असूनही त्यांच्यादेखत पक्षाचे होत चाललेले विघटन किमान त्यांना वेदना देणारे ठरावे. यातून मार्ग काढण्याचे धोरण ठरवण्याऐवजी भाजपला ‘टार्गेट’ करून गमावलेला जनाधार पुन्हा मिळवणे अशक्यप्राय आहे, हे राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांना कोण सांगणार? सततचे पराभव, पक्षगळती, कार्यकर्त्यांमधील संभ्रमता या मुद्द्यांवर अंतर्मुख होऊन पुन्हा नेटाने उभे राहण्याची दृढनिश्चितताच केवळ पुन्हा उभारी घेण्याची शिडी ठरू शकते, याचे भान नेतृत्वाने राखले गेले तर बरे होईल, इतकेच !

सुंभ जळाला तरी…
Milind Sajgurehttps://www.mymahanagar.com/author/milind-sajgure/
Resident Edior, Nashik Edition, Aaple Mahanagar
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -